Published On : Mon, Aug 5th, 2019

नागरिकांनो पावसाळ्यात सावधानता बाळगा:-तहसीलदार अरविंद हिंगे

Advertisement

कामठी :-पावसाळ्यात जोमाचा पाऊस सुरू असूनही गरजवंतांना घराबाहेर पडावे लागते नुकतेच मागील दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्यात वीज कोसळल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर एक जख्मि झाल्याची घटना घडली .पावसाळ्यात वीज कोसळून जीवित हानी घडण्याच्या घटना वाढत असतात तेव्हा वीज कोसळू नये यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे , सावधानता बाळगल्यास स्वतावर वीज कोसळण्याची शक्यता कमी होते तेव्हा नागरिकांनो पावसाळ्यात सावधानता बाळगा असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत .पावसाळ्यात मेघ गर्जनेसह वीज कोसळण्याचे प्रमाण सुद्धा अधिक असते यात दुर्दैवाने वीज कोसळून मृत्यू पावल्याच्या घटना घडतात .काही नागरिक वादळाची चिन्हे दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात व ऐनवेळी योग्य आसरा न मिळाल्याने जीवित हानी होते .विजा चमकत असताना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचा खांब, प्रक्षेपण मनोरा यासारख्या उंच असलेल्या जागाचा आश्रय टाळावा.विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणतीही जागा सुरक्षित नसते तरीही बंदिस्त इमारत,चारचाकी वाहन, ट्रक, बस, कार ही साधने बरीच सुरक्षित मानले जातात .वीज नेहमी सर्वात उंच जागेवर कोसळते .धातूची वस्तू जेवढी मोठी तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते , जेवढे झाड उंच तेवढा धोका अधिक असतो त्यामुळे झाडापासून दुर राहावे .त्यामुळे सावध राहून उपाययोजना कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बॉक्स:-वीज पडली तर करावयाचा प्रथमोपचार
जर तुमच्या जवळपास एखाद्या व्यक्तीवर वीज पडली असेल तर त्याच्यावर त्वरित प्रथमोपचार करा, श्वासोचछवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोचछवास नैसर्गिक रित्या सुरू होण्यास मदत होईल , हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआर चा उपयोग करावा , नाडीचा ठोका चालू असेल तर अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत तपासणी व नोंद करा .दृष्टी ठीक आहे किंवा नाही ,ऐकू येते किंवा नाही तसेच इतर हालचालींची नोंद घ्या.

बॉक्स :-वीज चमकताना हे करू नका
विद्दूत उपकरणे चालू करून वापरू नका , वादळात टेलिफोन , मोबाईल चा वापर टाळा, बाहेर असताना धातूंच्या वस्तूचा वापर करू नका. छत्र्या, कोयते, सूऱ्या, गोल्फ खेळण्याची काठी अशा धातूंच्या वस्तू जवळ ठेवू नका, वीज चमकायला लागल्यास जमिनीवर बसा, दोन्ही पावले जमिनीवर ठेवा, पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडा आणि त्याभोवताल हातांचा विळखा घाला,हनुवटी गुडघ्यावर दाबून धरा, मोकळ्या जागेत असाल तर शक्यतो कडेकपारीमध्ये आसरा घ्या , पाण्यात असाल तर जमिनीवर यावे.

मेघ गर्जना सुरू असताना हे करा
मेघ गर्जना सुरू असताना घराबाहेर असाल तर त्वरित आसरा शोधा, इमारत हा सर्वात सुरक्षित आसरा आहे.उंच झाडे स्वताकडे विजेला आकर्षित करीत असल्याने झाडाखाली कधीच थांबू नका, आसरा मिळाला नाही तर परिसरातील सर्वात उंच जागा टाळा , जवळपास फक्त उंचच झाडे असतील तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा ,जमिनीवर वाका आणि बसून राहा, वादळाची चाहूल लागली तर शक्यतो घराबाहेर जाणे टाळा, विजा चमकने सुरू असताना विजेच्या सुबाहकापासून दूर राहा, जर तुम्हाला विद्दूत भारित वाटत असेल म्हणजेच तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे तेव्हा त्वरित जमिनीवर गुडघ्यात मान घालून बसा..

संदीप कांबळे कामठी