
नागपूर – दक्षिण-पश्चिम नागपूरमधील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सुपूर्द केले आहे.त्यात प्रतापनगर ते सोमलवार हायस्कूल खामला दरम्यानच्या सिमेंट रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अपूर्ण रस्त्यामुळे या भागातील हजारो रहिवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अर्धवट रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत –
दत्त मेडिकल स्टोअर्सपासून बाबा सावजी रेस्टॉरंटपर्यंतचा उजव्या बाजूचा रस्ता पूर्ण झाला असून वाहतूक सुरळीत आहे. परंतु पोलिस चौकीपासून युनियन बँक चौकापर्यंत डाव्या बाजूचा सिमेंट रस्ता (विशेषतः माजी आमदार नानाजी श्यामकुळे यांच्या निवासस्थानासमोरील भाग) तब्बल वर्षभरापासून अर्धवट आहे. स्थानिक ठेकेदार KCC यांनी कोणतीही सूचना न देता काम थांबवले असून, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
युनियन बँक चौकातील ‘बॉटलनेक’ अपघातांना आमंत्रण –
युनियन बँक चौकात निर्माण झालेला अरुंद टप्पा म्हणजे बॉटलनेक ठरत असून, दोन्ही बाजूंचे I-ब्लॉक्स तुटले आहेत. तात्पुरते रॅम्प सततच्या वाहतुकीमुळे खराब झाले असून, संध्याकाळच्या वेळेस दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. स्थानिक दुकानदार मंगेश चंदनखेडे यांच्या मते, या ठिकाणी अपघात रोजचेच झाले आहेत. विशेषतः पावसात परिस्थिती गंभीर होईल.
खामला मार्गावरही बंद पडलेले काम –
युनियन बँक चौक ते खामला दरम्यानचा दुसरा सिमेंट रस्तादेखील गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रामकृष्ण नगर, अशोक कॉलनी, सिंधी कॉलनीसह अनेक वसाहतींतील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठेकेदार काम अधांतरी ठेवून पळाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पावसात वाढणारी भीती तारेकर ज्वेलर्सचे मालक बबलू तारेकर यांनी सांगितले की, “I-ब्लॉक्स काही घरांसमोर न बसवल्याने पावसात पाणी तुंबण्याचा धोका आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.”
बांधकाम व्यावसायिकांकडून पदपथावर अतिक्रमण – नागरिकांचा संताप-
टेलिकॉम नगर व युनियन बँक चौकात सुरू असलेल्या बांधकामामुळे पदपथ अडवले गेले आहेत. नागरिकांनी आरोप केला की, महापालिका भाजीविक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करते, पण श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांवर दुर्लक्ष केले जाते.
मुख्यमंत्र्यांकडे विनंती राणाप्रतापनगर, टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, अशोक कॉलनी, खामला बस्ती यांसारख्या भागांना जोडणारा हा रस्ता नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, अपूर्ण रस्ता तातडीने पूर्ण करून, बॉटलनेक ठिकाणी योग्य रॅम्प बसवून रस्ता सुरक्षित करण्यात यावा.
टेलिकॉम नगर नागरिक समिती आणि दक्षिण-पश्चिम नागपूरचे सर्व रहिवासी यांनी एकमुखाने या मागणीसाठी आवाज उठवला आहे.