
नागपूर : वर्धा रोडवरील गोवारी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना — राहाटे चौक व झीरो माईल चौक येथे — नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बनविण्यात आलेले गतिरोधक (स्पीड ब्रेकर) वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. हे गतिरोधक अत्यंत उंच व असुविधाजनक असल्याने अपघातांचा धोका वाढला असून, नागपूर महानगरपालिकेकडे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत आहेत.
वाहनचालकांच्या तक्रारीनुसार, या ठिकाणी तयार केलेले गतिरोधक मानकांनुसार नसून, रात्रीच्या वेळी त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेकांना धक्का बसतो आहे. सोशल मीडियावरही नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पत्र पाठवून या गतिरोधकांची IRC मानकांनुसार शहानिशा करण्याची व आवश्यक त्या सुधारणा करण्याची सूचना दिली आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी ठळक मार्किंग आणि सूचना फलक लावण्याचेही निर्देश दिले आहेत.
या पत्राची प्रत आयुक्त व प्रशासक, अतिरिक्त आयुक्त (शहर), मुख्य अभियंता, तसेच पोलीस उपआयुक्त (वाहतूक) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी या ठिकाणावरील रस्त्यांची पाहणी करून तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.










