
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना प्रारूप मतदार यादीनं महापालिकेचीच परीक्षा घेतली आहे. जाहीर झालेल्या यादीनंतर शहरभरातून तब्बल १,३२७ हरकती नोंदल्या गेल्या असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये तब्बल ६६३ आक्षेप नोंदवले गेल्याने हा झोन सर्वाधिक वादग्रस्त ठरला आहे.
मतदार याद्यांतील विसंगती, चुकीची नावे, पत्ते आणि नाव वगळण्याच्या तक्रारींमुळे विविध झोनमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी हरकती दाखल केल्या. इतर झोनच्या तुलनेत लक्ष्मीनगरमध्ये तक्रारींचा स्फोट झाला आहे. तर दुसरीकडे मुख्यालयात फक्त ७ तक्रारी नोंदल्याने दोन्ही ठिकाणांच्या आकडेवारीतील तफावत विशेष लक्षवेधी ठरली आहे.
झोननिहाय हरकतींचा तपशील:
मुख्यालय – ७
लक्ष्मीनगर – ६६३
धरमपेठ – १०
हनुमान नगर – ८३
नेहरूनगर – ६५
सतरंजीपुरा – ६०
गांधीबाग – ४६
आशी नगर – १६७
मंगलवारी – १०८
धंतोली – ६३
निवडणूक आयोगाने हरकती स्वीकारण्याचा कालावधी संपल्याचे सांगितले असून, आता सर्व तक्रारींची सखोल तपासणी सुरू आहे. १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांचे निर्धारण केले जाईल. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागपूर महानगरपालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०१७ च्या तुलनेत हरकत संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या वेळी ५३५ तक्रारी आल्या होत्या; यंदा मात्र हा आकडा जवळपास तीनपट वाढला असून मतदार याद्यांतील त्रुटींचे गांभीर्य उघड झाले आहे.









