Published On : Thu, Oct 22nd, 2020

पोलीसांची खाती एचडीएफसी बँकेत उघडण्यासाठी परिपत्रक अनिल गलगली यांचा आक्षेप

Advertisement

मुंबई पोलिसांच्या वतीने एक विशेष परिपत्रक जारी करून पोलीसांची खाती एचडीएफसी बँकेत उघडण्यासाठी करारनामा झाला असून यास आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आक्षेप नोंदविला आहे. यापूर्वी ऍक्सिस बँकेचे खाते उघडल्याने वाद निर्माण झाला होता.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह मंत्री अनिल देशमुख यांस पत्र पाठवून निर्दशनास आणले आहे की एचडीएफसी बँक ही खाजगी बँक आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी 21 ऑक्टोबर 2020 रोजी करारनामा केला आहे. मुंबई पोलिसांचा दावा आहे की सर्व प्रस्तावात एचडीएफसी बँकेचा प्रस्ताव अधिक फायदेशीर व त्यांनी देवू केलेल्या सोयी सुविधा इतरांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आल्याने दिनांक 21/10/2020 रोजी बृहन्मुंबई पोलीस दलातील सर्व कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांचे वेतनाचे खाते उघडण्याकरिता एचडीएफसी बॅंकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

अनिल गलगली यांच्या मते यापूर्वी ऍक्सिस बँक ही खाजगी असल्यामुळे सर्वानी विरोध केला आणि आता महाविकास आघाडी सुद्धा खाजगी बँकेला झुकते माप देत आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या बँकेत खाते उघडावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून अशा करारनामा करण्यापूर्वी सर्वांचे मत जाणून घेणे अपेक्षित आहे, असे सरतेशेवटी गलगली यांनी नमूद केले आहे.