Published On : Tue, Jun 11th, 2019

मुख्यमंत्र्यांना नागपूरचे वासेपूर करायचे आहे का?-चित्रा वाघ

मुख्यमंत्र्यांना नागपूरचे वासेपूर करायचे आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. नागपूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि संताप आणणारी आहे. असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे

शाळेच्या आवारातच सुरक्षा रक्षकांच्या नातेवाईकांकडून अतिप्रसंग करण्याचा व बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीची सात तास त्या मेडीकल टेस्ट करण्यात आली. या घटनेतले आरोपी फरार आहेत.अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणणं चुकीचं ठरणार नाही असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

चार महिन्यापुर्वी शाळेच्या बस कंडक्टरने शाळेतील मुलीवर बलात्कार केला. डब्लुसीए कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार झाला. रोज कुठे ना कुठे राज्यामध्ये या घटना घडत आहेत. याविषयावर बोललं जातं त्यावेळी गुन्हयाची नोंद करण्यात वाढ होतेय. गुन्हेगारीत वाढ होतेय हे मुख्यमंत्रीच सांगत आहेत मात्र यावर कठोर उपाय योजत नाहीत असाही आरोप चित्रा वाघ यांनी केला.राज्यात एवढ्या सगळ्या घटना घडत असताना शिवसेना भाजप सरकारचे लोक गप्प का बसले आहेत असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.