नागपूर – अक्षय्य तृतीयेच्या आधी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बालविवाह घडण्याच्या मार्गावर होते. मात्र, जिल्हा बाल संरक्षण पथकाने वेळेवर हस्तक्षेप करत दोन्ही विवाह थांबवले आणि संबंधित मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात हलवण्यात आले.
डोंगरगावमध्ये अवघ्या १५ वर्षांच्या मुलीचा विवाह पार पडणार होता. विवाहपूर्व तयारी पूर्ण झाली होती. हळद समारंभ होऊन मुलगी लग्नासाठी सज्ज होती. मंडपात पाहुण्यांचे आगमन सुरू होते आणि स्वयंपाकही झाला होता. पण, चाईल्ड लाईनमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे बाल संरक्षण पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मुलीची वयाची कागदपत्रे तपासल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. नातेवाइकांनी विरोध दर्शवला, मात्र पोलिसांच्या मदतीने मुलीला ताब्यात घेण्यात आले.
दुसरी घटना कन्हान परिसरातील असून, तिथे १७ वर्षांच्या मुलीचा विवाह होणार होता. या ठिकाणीही पथकाने तत्काळ कारवाई करत विवाह रोखला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रणजित कुर्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण आणि त्यांच्या टीमने कामगिरी केली.
विशेष म्हणजे, बालविवाहास हातभार लावणाऱ्या मंडप सजावट करणारे, आचारी आणि डीजे चालक यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, यापुढे कोणतेही लग्न स्वीकारण्यापूर्वी मुलीचे वय कायदेशीर आहे का, याची खात्री करूनच काम घ्यावे, अन्यथा एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही घटना बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच कठोर कायदा अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित करते.