नागपूर :नागपूर शहरातील लकडगंज परिसरात गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाकीत पडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, कचरा संकलन करणाऱ्या बीओजी कंपनीच्या ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी आहेत. या दोन्ही प्रकरणांवर माजी आमदार कृष्णा खोपडे यांनी मनपाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.
मनपाच्या निष्काळजीमुळे निष्पाप जीव गमवावा लागला-
कृत्रिम विसर्जन टाकीत सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू ही मनपाच्या हलगर्जीपणाची परिणती असल्याचं आमदार खोपडे यांनी म्हटलं. त्यांनी आरोप केला की, मनपाने तयार केलेल्या सुमारे ४०-५० फुट खोल टाकीत ना पायऱ्या होत्या, ना वर चढण्यासाठी कुठलाही हुक किंवा सुरक्षा साधन. “जर एवढ्या खर्चातून टाकी बनवली गेली, तर सुरक्षेची खबरदारी घेण्यात काय अडचण होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बीओजी ट्रक अपघातानंतरही मनपा गप्प!
खोपडे यांनी दुसऱ्या घटनेचा उल्लेख करत सांगितले की, बीओजी कंपनीच्या कचरा संकलन ट्रकने एका कुटुंबाला उडवले. यात कुटुंबातील एक सदस्य ठार झाला, तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्या. “मनपाचा एकही अधिकारी घटनास्थळी गेला नाही, ना पीडित कुटुंबाशी संपर्क साधला. हा अतिशय दुर्दैवी आणि अमानवी प्रकार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विधानसभेत आवाज उठवणार –
या घटनांमुळे संतप्त झालेल्या आमदार खोपडे यांनी जाहीर केलं की, ते विधानसभा अधिवेशनात हे मुद्दे जोरकसपणे मांडणार आहेत. “मनपाच्या सहायक आयुक्ताला त्वरित निलंबित करण्यात यावे आणि पीडित कुटुंबाला बीओजी कंपनीकडून १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी आमची मागणी असेल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
दरम्यान, मृत बालकाच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी लकडगंज झोन कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. “दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली. या दोन्ही घटनांनी नागपूर महापालिकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, मनपाने यावर तत्काळ स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी होत आहे.