Published On : Wed, Aug 29th, 2018

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग, वाशी खाडीवरील पुलाचे बांधकाम एक महिन्यात सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम, सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देऊन एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग
वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

वाशी येथे तिसऱ्या पुलाचे बांधकाम
ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिका
खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणारा दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी 11 कि.मी. असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा 650 मीटरचा केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षक असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement