Published On : Thu, Mar 22nd, 2018

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन समिती कक्षात घेतला. मेट्रो व उड्डाणपुलाची प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पदुममंत्री महादेव जानकर, गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर, आमदार आशिष शेलार, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त यु पी एस मदान, नगर विकास चे प्रधान सचिव नितीन करीर, बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, वन विभागाचे सचिव विकास खारगे आदींसह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जोगेश्वरी पूर्व-पश्चिम उड्डाणपूल व मेट्रोच्या कामाबाबत श्री. मदान यांनी आराखड्याद्वारे माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, तीन महिन्यात कामाचे नियोजन करून पावसाळ्यापूर्वी कामास प्रारंभ करावा. मेट्रो व उड्डाणपुलाचे काम एकाचवेळी होणार असल्याने याचा त्रास नागरिकांना होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.

जोगेश्वरी लिंक रोडवरील ५०० फुटाचा रस्ताही उड्डाणपुलाला जोडून घेतल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शिवाय पंप हाऊसजवळील भुयारी मार्गाबाबत वाहतूक शाखेने त्वरित निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जोगेश्वरी, मेघवाडी आणि आरे कॉलनी पोलीस स्टेशन बांधकामाबाबतही त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.