Published On : Fri, Jun 28th, 2019

मराठा समाजाला आरक्षण देणार मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस यांनी घडविला इतिहास

Advertisement

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे मुख्यमंत्री असा इतिहास स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर जमा आहे आणि तो कायमस्वरूपी त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत राहणार आहे.महाराष्ट्र आणि देशाला रोजगार हमी देणारे नेते म्हणून वि.स. पागे यांच्या नावाचा आजही आदराने उल्लेख केला जातो. पागे साहेबांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम आणलेली ही योजना नंतर देशाने स्वीकारली. हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषि क्रान्ति साठी दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची नोंद झाली आहे आणि काल आणखी एक ऐतिहासिक नोंद महाराष्ट्राच्या वर्तमानाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांमध्ये झाली आहे आणि ती म्हणजे,” महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला आरक्षण देणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”.

मराठा आरक्षणाचा कायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केला होता पण तो न्यायालयात टिकला नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू केले. लाखो लोकांचे मूक मोर्चे निघाले. त्या मोर्चामध्ये अभूतपूर्व अशी शिस्त होती. सकल मराठा समाजाने लाखोंचे मोर्चेही शांततेत निघू शकतात याचा नवा आदर्श महाराष्ट्रासमोरच नव्हे तर देशासमोर उभा केला.

शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी आंदोलन हिंसक बनले. मराठा समाजातील काही जणांना जीव गमवावा लागला. हे अत्यंत दुर्दैवी होते. सामाजिक प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहतांना प्रचंड व्यथित होते. आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही जातीपातीचा विचार फडणवीस यांनी स्वतःला शिवू दिलेला नाही. एक ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे आरक्षण देण्यास विलंब होत असल्याचे समाज माध्यमांमधून लिहिले गेले तेव्हा तर फडणवीस निश्चितच अत्यंत व्यथित झाले असतील. आपल्याला कसे कसे ट्रोल केले जात आहे हे त्यांना माहिती होते पण, या उमद्या मुख्यमंत्र्याने मी कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईलच असा निर्धार केला होता. घाणेरडे आरोप केले जात होते, फेसबुकवर पोस्ट फिरत होत्या, मुख्यमंत्र्यांच्या जातीपासून त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यापर्यंत घाणेरडे लिहिणारे काही माथेफिरुही होते पण मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कधीही आकस बाळगला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भावना आपण समजून घेतली पाहिजे, बोटावर मोजण्याइतके लोक कशाही पद्धतीने व्यक्त होत असले तरी आम मराठा समाज अत्यंत सुसंस्कृत आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वर्तमानात अतिशय मोलाचे योगदान देणाऱ्या या समाजाला आज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे अशी भूमिका फडणवीस यांनी सातत्याने मांडली.

मी माझ्यातील वकिली कौशल्याचा पूर्ण उपयोग करेन.राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेच्या मदतीने उच्च न्यायालयात अतिशय प्रभावीपणे भूमिका मांडली जाईल आणि मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून देईनच, हा त्यांचा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या कालच्या निकालाने सार्थ ठरवला.

फडणवीस यांनी आरोपांची तमा न बाळगता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या स्वतःच्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक राहत कार्यवाही केली.धीरोदत्तपणा बाळगला. अडीचतीन वर्षे फडणवीस यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेरण्याची कुठलीही संधी विरोधकांनी सोडली नाही.मराठा आंदोलन भडकविण्याचे प्रयत्न झाले. त्याच्या पडद्याआड कोण सूत्र हलवत होते हे महाराष्ट्रातील सुजाण लोकांना चांगलेच माहिती आहे. फडणवीस कसे टार्गेट होतील यासाठी एक दोन नव्हे तर ‘बारा’मती वापरल्या गेल्या. मराठा आंदोलन जोरात असताना पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळाले. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीची धूळधाण उडाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताब्यातील सांगली महापालिकेतही कमळ फुलले.लोक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करीत असले तरी त्यांच्या मनात मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपबद्दल आकस नव्हता हे सिद्ध झाले आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाने तर त्यावर शिक्कामोर्तबच केले.

ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आजही भाजपसोबत आहे.काल मिळालेल्या ऐतिहासिक आरक्षणाने मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वास निश्चितच वाढला आहे. राज्यातील अठरापगड जातींना हा मुख्यमंत्री एक विश्वासार्ह चेहरा वाटतो. राज्यातील सामाजिक समीकरणांकडे अत्यंत निकोप वृत्तीने फडणवीस नेहमीच पाहत आले आहेत. वर्तमान त्यांचे आहे आणि भविष्यही त्यांचेच असेल.