Published On : Tue, Dec 10th, 2019

राज्यातील गरीब रूग्णांना मोफत वैद्यकीय सुविधांसाठी भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र – मुख्यमंत्री

मुंबई : पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतली भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आज विधानमंडळाच्या प्रांगणात महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट ऑफ डायजेस्टीव्ह सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पद्मश्री डॉ.अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ केंद्र हे भारतातील पहिले केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्ट‍िट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे.

समाजाचे आपण देणे लागतो, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. या विचाराने सुरू झालेली ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे. या गाडीत उपस्थित असणारे 2 तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचं लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचं निदान, ॲसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल. रूग्णांचे निदान तत्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात या दृष्टीने एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली असून वर्षभर ही व्हॅन राज्यभर फिरणार असल्याचे डॉ.मायदेव यांनी सांगितले.

ही सुविधा चालू करण्यासाठी श्री नरेंद्र कुमार बलदोटा व परिवार यांनी यासाठी देणगी देऊन पुढाकार घेतला आहे. या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असणार आहे. त्यामुळे पोटविकार होण्याची कारणे व त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास डॉ.मायदेव स्वत: गाडीवर उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करतील. या गाडीचे प्रभारी म्हणून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ.अमित मायदेव सर्व कामकाज पाहणार आहेत.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आमदार आदित्य ठाकरे, माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळ, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बीआयडीएस केंद्राचे संचालक पद्मश्री डॉ.अमित मायदेव आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement