Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो;नारायण राणेंचा नितेश राणेंना सल्ला

Advertisement

धाराशिव : भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, या वादग्रस्त वक्तव्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नितेश राणेंना आता स्वतःचे वडील आणि भाजप नेते नारायण राणे यांनीच कान टोचले आहेत. “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. तो जनतेचा सेवक असतो,” अशा शब्दांत त्यांनी मुलाच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

नारायण राणे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी धाराशिव येथे आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधत हा स्पष्ट सल्ला दिला. त्यांनी नितेश राणेंच्या निधीवाटपावर केलेल्या टीकेवरही आपली भूमिका स्पष्ट केली. “निधी अडवणे हे चुकीचे आहे, याबाबत मी स्वतः लक्ष घालीन,” असेही त्यांनी नमूद केले.

याच वेळी त्यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “प्रकाश महाजन हा मानसिक असंतुलन असलेला व्यक्ती आहे. माझी त्याच्याशी तुलना का करता? मी दिल्लीला असतो, तो इकडे रस्त्यावर उभा असतो,” असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, नितेश राणेंच्या ‘बाप’ वक्तव्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, ठाकरे गटाने ठाण्यात बॅनर लावून प्रत्युत्तर दिले आहे. मी तुषार दिलीप रसाळ… श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत,” असा मजकूर असलेला बॅनर तीन हात नाका येथे झळकला होता. मात्र, तो बॅनर नंतर महानगरपालिकेने हटवला.

Advertisement

नितेश राणेंच्या वक्तव्यावर त्यांच्या भावाने शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. “कोणत्या वक्तव्यामुळे कोणाचा फायदा होतो, हे समजून बोला,” असे सूचक ट्विट त्यांनी केलं होतं, जे काही वेळातच हटवण्यात आलं.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांबाबत विचारल्यावर नारायण राणे म्हणाले, ते एकत्र आले तर चांगलेच होईल, पण सध्या याबद्दल काही माहिती नाही.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.