Published On : Thu, Aug 16th, 2018

चिमूरमध्ये शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Advertisement

चिमूर: चिमूर येथील स्वातंत्र्यलढ्यात बलिदान केलेल्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस आज चिमूर येथे क्रांती दिनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकास त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी शहिदांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांनी किल्ला परिसरातील शहिदांच्या स्मृती भवनाला भेट दिली. याठिकाणी उभारण्यात आलेल्या नागाच्या प्रतिकृतीतील शहीद स्मारकाला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा उपस्थित होते.

या दोन्ही ठिकाणी शहिदांना नमन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चिमूर येथील बीपीएड कॉलेज येथे आयोजित सभास्थळी भेट दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांच्यामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य अनुभवता येत आहे, त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. चिमूरच्या स्वातंत्र्य लढ्यामुळेच स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले, त्या सर्व शहिदांना मी अभिवादन करतो.

त्यानंतर चिमूर क्रांती लढ्यातील शहिदांना मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, महापौर अंजलीताई घोटेकर आणि या कार्यक्रमाचे आयोजक कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, संजय देवतळे आदी उपस्थित होते.