
अमरावती : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथे आयोजित ‘शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले.
महायुतीतील जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सकारात्मक भूमिका मांडली. “जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. हा पेच लवकरच सुटेल, अशी मला पूर्ण खात्री आहे. युती नक्कीच होईल आणि कोणतीही अडचण येणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.
या चर्चेचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार आणि संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख नेते एकत्रितपणे या चर्चेत सहभागी असल्याची माहितीही त्यांनी दिली.
“काल रात्रीपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व स्तरांवर चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे,” असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील समन्वयाबाबत विश्वास व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला हा आशावाद महायुतीतील घटक पक्षांसाठी दिलासादायक मानला जात असून, येत्या काही तासांत जागावाटपाबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








