मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उद्धव ठाकरे यांना थेट सत्ता सामील होण्याची खुली ऑफर दिली. “आम्ही २०२९ पर्यंत विरोधातच राहू, मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे,” असं वक्तव्य त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केलं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा तापली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
राऊत म्हणाले की, “फडणवीस टपल्या आणि टिचक्या मारण्यात पटाईत आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा विधानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही.” सध्या फडणवीस डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “फडणवीस यांच्यासोबत बसलेले लोक नैतिक आणि वैचारिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा लोकांच्या साथीने बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला सत्तेची ऑफर देणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचे स्पष्ट लक्षण आहे.”
राजकारण ही अनिश्चिततेने भरलेली बाब आहे. नरेंद्र मोदींनी एकेकाळी लाहोरमध्ये झेंडा फडकवला होता, तेव्हा वाटलं होतं की शांतता प्रस्थापित होईल, पण आज काय परिस्थिती आहे हे सर्वांना माहिती आहे, अशा शब्दांत राऊतांनी राष्ट्रीय घडामोडींचा दाखला देत भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला असून इंडिया आघाडीची बैठक बोलविण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप एकही बैठक झालेली नाही, त्यामुळे अनेक घटक पक्ष अस्वस्थ असल्याचं राऊतांनी नमूद केलं. ही बैठक १९ जुलैला होण्याची शक्यता असून त्यानंतरच ठाकरे यांचा दिल्ली दौरा निश्चित होईल.
या बैठकीत स्थानिक निवडणुकांऐवजी संसद आंदोलन, महागाई, बेरोजगारी यांसारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बोलणे ही वेळ वाया घालवण्यासारखी बाब ठरेल, असं स्पष्ट करत राऊतांनी आगामी राजकीय दिशा अधोरेखित केली.