Published On : Fri, Jul 13th, 2018

पाणी माफियाविरूद्ध कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

CM-Fadnavis-

नागपूर: मुंबई येथील कांदिवली (पूर्व) येथील क्रांतीनगर या उंच व डोंगरावर असलेल्या झोपडपट्टीला पाणीपुरवठा मालाड जलाशयातून होतो. काही ठिकाणी पाणी टंचाई झाल्याने पाणी माफिया पाणी चोरून टाक्यांमध्ये साठवून जादा दराने पाणी विकत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिले.

कांदिवली (पूर्व) क्रांतीनगर भागातील पाणी टंचाईविषयीची लक्षवेधी सूचना सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, क्रांतीनगर या भागातील झोपडपट्टीला पाणीपुरवठा करण्यासाठी मालाड जलाशयातून 1500 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी असून त्यातून 150 मिमी व्यासाची वितरण जलवाहिनी टाकली आहे.

ही झोपडपट्टी जलवाहिनीपासून 25 मीटर उंचावर असल्याने पाणीपुरवठा कमी-जास्त होतो. यासाठी निम्नस्तरावर शोषण टाकी व उदंचन व्यवस्था करून शोषण टाकीत जलजोडणी देण्यात आली आहे. शिवाय जलाशयाच्या दुरूस्तीचे काम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. यानंतर नियमित पाणीपुरठा सुरू आहे.

याठिकाणी पाणी चोरून टाक्यांमध्ये साठवून विकण्याचा प्रयत्न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मनपा व पोलीस यंत्रणेला दिले आहेत. शिवाय 115 अनधिकृत जलजोडण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने खंडित केल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.