Published On : Sun, Feb 25th, 2018

सातारा जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यासाठी २५ कोटी, सातारा शहराची हद्दवाढ आणि मेडिकल कॉलेजसाठी जागा या सातारा जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याच्या प्रमुख तीन मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच राज्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार उपस्थित होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जलसंपदा राज्यमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, सातारा शहराच्या नगराध्यक्षा माधवी कदम, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे , उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा हा आनंदाचा दिवस आहे. आजच्या या मंचाला कोणताही पक्ष, समाजाचे बंधन नाही. उदयनराजेंवर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम असून ते मुक्त विद्यापीठ आहेत. मित्रांचा मित्र असणारा, प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नेता आहे. उदयनराजे हे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देणारे नेते आहेत. आज ग्रेड सेपरेटर, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भुयारी गटारी योजनेचे उद्घाटन हे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत.

भारताला गुलामगिरीने वेढले होते, त्याकाळी शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील अठरा पगड जातींना एकत्र करून असुरी शक्तीचा नाश करण्याचे काम महाराजांनी केले. छत्रपती शिवरायांच्या विचारांवरच महाराष्ट्राचे काम सुरु आहे. छत्रपतींनी महाराष्ट्राला जगण्याची शक्ती आणि प्रेरणा दिली. खासदार उदयनराजे यांनी मागणी केलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी २५ कोटी, सातारा शहराची हद्द वाढविणे आणि मेडिकल कॉलेजसाठी जागा या तीन प्रमुख मागण्यांची लवकरच पूर्तता करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच्या कल्याणासाठी कायमच दक्ष असणारे राजे होते. सामान्य रयतेच्या विकासासाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी ही आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला, ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांनी कायमच रयतेच्या हिताचा विचार केला. अशा महान छत्रपतींचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. त्यांचे वंशज असणारे खासदार उदयनराजे भोसले हे कर्तृत्वाबरोबरच नम्रता असणारा माणूस आहे.

पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे विचारच आपल्याला पुढे नेणार आहेत. त्यांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत. शिवछत्रपतींच्या मनातील कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे काम सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले हे रयतेसाठी काम करणारे नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, रयतेच्या कल्याणाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिली. याच शिकवणीनुसार आयुष्यभर सामान्य लोकांच्या कल्याणाचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कास तलावाची उंची वाढविण्याच्या कामाचे रिमोटद्वारे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते किल्ले अजिंक्यताऱ्याची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला.