Published On : Mon, Jul 2nd, 2018

पोलीस वाहनावरील जी.पी.एस प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

नाशिक: जिल्हा नियोजन व विकास समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे जी.पी.एस. प्रणालीने सुसज्ज गस्ती पथकाचे वाहन व फिरते पोलीस ठाणे उपक्रमाचा शुभारंभ ओझर विमानतळ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरींग दोरजे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या विविध तक्रारीसंदर्भात सुरक्षिततेची हमी वाढविण्यासाठी कार्यक्षम पोलीसिंग करणे व जवळ असलेल्या पोलीस वाहनास नागरिकाच्या मदतीत त्वरीत पाठविण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. एकूण 92 वाहनांवर जीपीएस आधारीत प्रणाली बसविण्यात आली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली अपघाताच्या वेळेस आणि गंभीर गुन्ह्याच्यावेळी जलदगतीने व अचुकतेने मदत पाठविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जीपीएस प्रणालीसोबत फिरते पोलीस ठाणे ही महत्वपूर्ण योजना ग्रामीण पोलीस दलातर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 40 पोलीस ठाणे अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिला अत्याचार, बँक व सोशल मिडियाद्वारे फसवणुकीचे प्रकार, चेन स्नॅचिंग आदी प्रकार टाळण्यासाठी फिरते पोलीस ठाणे उपयुक्त ठरणार आहे.