Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 2nd, 2018

  जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्व सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  नाशिक: नाशिक जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडून सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

  कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गड येथे उभारण्यात आलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, सर्वश्री आमदार छगन भुजबळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिपीका चव्हाण, पंकज भुजबळ, राहुल आहेर, नरेंद्र दराडे, बाळासाहेब सानप, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरींग दोरजे, सप्तश्रृंगी निवासीनी देवी ट्रस्टच्या अध्यक्षा यु. एन. नंदेश्वर आदी उपस्थित होते.

  श्री.फडणवीस म्हणाले, देशात आर्थिक पर्यटनाला अधिक महत्व आहे त्यामुळे तीर्थस्थळांचा विचार करतांना भाविकांना चांगल्या सुविधा पुरविल्या तर तेवढीच चांगली अर्थव्यवस्था उभी रहाते. फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध झाल्याने गडाच्या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  मुख्यमंत्री म्हणाले, देवीच्या शक्तीपीठाकडे जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशातील पहिला प्रयोग या ठिकाणी करण्यात आला आहे. इथल्या सुविधा जागतिक दर्जाच्या असून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांना आईचे दर्शन सहजपणे घेता येईल. गडावरील पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

  श्री.महाजन म्हणाले, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी गड, नाशिक आणि शिर्डी येथील पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर येथे शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेतून पायाभूत सुविधांचा विकास करणयाबरोबरच रोप-वेची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा असा शासनाचा प्रयत्न आहे. फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे भाविकांना देवीचे दर्शन घेणे आधिक सुलभ होईल. गडावर डोलीचा व्यवसाय करणाऱ्यांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
  श्री.भुसे म्हणाले, सप्तश्रृंगी गडाचा ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळामध्ये समावेश करण्यात आला असून गडावरील विकासाला चालना देण्यासाठी 25 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गड परिसरात पर्यटन विकासाच्या दृष्टीने कामे करण्यात येतील.

  यावेळी आमदार छगन भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य अभियंता हेमंत पगारे यांनी फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाला सरपंच सुमनबाई सुर्यवंशी, मुख्य वनसंरक्षक रामाराव, अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, कार्यकारी अभियंता किशोर केदार, बी.पी. वाघ, राजकुमार गुरूबक्षाणी, सोमनाथ लातुरे आदी उपस्थित होते.

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाझर तलाव नुतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्पूर्वी गडावरील भवानी पाझर तलाव नुतनीकरण कामाचे लोकार्पण केले. त्यांनी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. धरणाची लांबी 180 मी. असून धरणाची साठवण क्षमता 6.68 द.ल.घ.फूट आहे. चणकापूर धरण येथून 25 कि.मी.ची थेट पाईपलाईन करण्यात आली आहे. या तलावाच्या नुतनीकरणामुळे भाविकांसाठी पाण्याची चांगली सुविधा होणार आहे.

  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्लास्टीक बाटल्यांवर प्रक्रिया करण्याच्या यंत्राचे उद्घाटनदेखील मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145