Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Nov 1st, 2018

  प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

  मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केले.

  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षी कमी फटाके वाजले. मुंबईसह राज्याचे प्रदूषण कमी झाले होते. यामध्ये शालेय मुलांनी मोठा सहभाग घेतला होता. अलीकडे मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागृती झाली आहे. ते स्वत: आपले आई वडील, नातेवाईक आणि मित्रांना कमी आवाजाचे फटाके वाजवा म्हणून सांगतात. याही वर्षी मुलांनी आणि पालकांनी कमी आवाजाचे फटाके वाजवून पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी. आपल्या राज्यात प्लास्टिक बंदीची मोहीम राज्यभर सुरु आहे. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. ध्वनीप्रदूषण, फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबविण्यासाठी पर्यावरण विभाग झपाट्याने काम करीत आहे. या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

  पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, राज्यातील काही भागात आणि मुंबई शहरात हवा प्रदूषित झाली आहे. त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपल्याकडे साजरे होणारे सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे केले तर हवा प्रदूषित होणार नाही. त्यामुळे आरोग्यावरही दुष्परिणाम होणार नाही. येणारी दिवाळी आपण सर्वांनी फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त साजरी करावी. लहान मुलांनी तर फटाकेच वाजवू नयेत. जर वाजवायचे असतील तर कमी आवाजाचे वाजवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

  याच कार्यक्रमात अंध मुलांनी तयार केलेल्या भारतातील पहिल्या ब्रेल लिपीतील दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. तसेच फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतची शपथ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित मुलांना आणि नागरिकांना दिली.

  प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई-रविंद्रन यांनी केले. त्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबतच्या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, राजशिष्टाचारमंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145