Published On : Fri, Aug 28th, 2020

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांची वीजबिल माफीची घोषणा फसवी : बावनकुळे

Advertisement

अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल

नागपूर: कोरोनामुळे लॉकडाऊन असताना मार्च महिन्यात राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी वीज ग्राहकांचे प्रतिमहिना तीनशे युनिट वीजबिल माफ करण्याची मागणी आपण केली होती. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनीही वीजबिल माफीबाबत निर्णय घेण्याचे सांगितले होते. आता मात्र मुख्यमंत्री ठाकरे व ऊर्जामंत्री राऊत यांनी केलेली घोषणा फसवी ठरली असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश महामंत्री व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीचा प्रस्ताव महावितरणने शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती खुद्द ऊर्जामंत्र्यांनी माध्यमांना दिली होती. तो प्रस्ताव शासनाने आता अमान्य केला आहे. त्यामुळे जनतेला दिलेले आश्वासन पोकळ ठरले आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांना 300 युनिट प्रतिमहिना याप्रमाणे गेल्या 4 महिन्याचे 1200 युनिट वीजबिल माफ करण्याची मागणी आपण केली होती. ही मागणी मान्य केली नाहीच. उलट वारेमाप रिडिंगचे वीजबिल प्रत्येकाला या शासनाने पाठविले. सर्वसाधारण ग्राहकाला 15 ते 20 हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात कोणतेही मीटर रिडिंग घेण्यात आले नाही. केवळ अंदाजे हिशेब करून बिले पाठविण्यात आली. या संदर्भात अनेक तक्रारी महावितरणकडे गेल्या असता कोणत्याही तक्रारीचे समाधान न करता आधी बिल भरा नंतर समायोजित करू, असा पर्याय ग्राहकांना सांगून भरमसाठ बिले भरण्यास भाग पाडण्यात येत आहेत, याकडेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

तसेच आधी भरमसाठ बिले पाठवायची व नंतर ग्राहकांवर उपकार म्हणून त्याचे हप्ते पाडून द्यायचे, असा खेळ ऊर्जा खात्याने चालविला असल्याचे सांगताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, रुफ टॉप सोलरला स्वत: ऊर्जामंत्री प्रोत्साहन देत आहेत. आमच्या शासनानेही प्रोत्साहन दिले होते.

पण कोविडच्या काळात महावितरणने रूफ टॉप सोलरचे रिडिंगच गृहीत धरले नाही. त्यामुळे रुफ टॉप सोलर लावलेल्या हजारो ग्राहकांनाही 20 ते 25 हजार रुपये वीज बिल देण्यात आले. आता ते त्यांना आधी भरण्यास सांगण्यात येत आहे. असा गोंधळ या खात्यात सुरु असून ऊर्जा मंत्र्यांचे याकडे लक्ष नाही काय, असा प्रश्न उपस्थित करून जर 300 युनिट प्रतिमहिना याप्रमाणे कोविड काळातील वीजबिल माफ करण्यात आले नाही, तर भाजपातफें संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला आहे.