Published On : Mon, Aug 26th, 2019

मृद व जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : मृद व जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

अजनी येथील वैनगंगा नगर वसाहत परिसरातील मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमास अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता मृद व जलसंधारण, प्रादेशिक क्षेत्र पुणे-नागपूर सु.पां. कुशिरे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी र.रा. बानुबाकडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सु.शि. सोळंके तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जलसंधारणाची कामे सुक्ष्म व सर्वदूर विखुरलेली असतात. विदर्भातील जिल्हयांची जलसंधारणासंदर्भातील कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी या नवीन कार्यालयाचा नक्कीच उपयोग होणार आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय राखून जलसंधारणाची कामे दर्जेदार करावीत. जिल्हयात ढोरापोरा नाला तसेच सुर सांड नदीवर दहा साखळी बंधारे तसेच नाग नदीच्या पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असून नागपूर जिल्हयात नाला जोड प्रकल्पांवर विशेष भर देण्यात येत असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

विदर्भातील बहुतांश जिल्हयांमध्ये कापूस हे नगदी पीक असून पूर्व विदर्भात धान हे मुख्य पीक आहे. ही दोन्ही पिके शेतकऱ्यांसाठी मुख्य आधार आहे. विदर्भातील कोरडवाहू शेती फायदयात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी नागपूर येथे मुख्य अभियंता कार्यालय सुरु करण्यात आले. यानंतर उपलब्ध निधीतून अमरावती व नागपूर मंडळांनी सिंचन विकासाची कामे केली. विदर्भाकरिता मुख्य अभियंता कार्यालय अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामुळे विदर्भातील जिल्हयांमध्ये जलसंधारणाची कामे जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.