Published On : Wed, Oct 25th, 2017

छठ पूजा अंतिम तयारीचा महापौरांनी घेतला आढावा

Advertisement


नागपूर: उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठ पूजेची तयारी पूर्ण झाली असून महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण तयारीचा बुधवारी (ता. २५) आढावा घेतला. गुरुवारी (ता. २६) सायंकाळी छठ पूजेच्या निमित्ताने लाखो भाविका अंबाझरी, फुटाळा, टाकळी येथील तलावावर एकत्रित येणार असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासोबत स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, महिला व बालकल्याण सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, नगरसेवक कमलेश चौधरी, राकेश निकोसे, बहुराष्ट्रीय छठ व्रत संस्थेचे पदाधिकारी संजय शर्मा, विमल शर्मा, अजय कुमार, महेश ठाकूर, मुकेश राय, विवेक कुमार, संतोष शर्मा, श्री. चंचल, शेखर रॉय, अजय पाठक, कुमार शिवम, कुमार शुभम, सचिन सिंग उपस्थित होते.

मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या तयारीसंदर्भात महापौरांनी समाधान व्यक्त केले. पूजा ठिकाणी भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, छठ पूजा श्रद्धेचा विषय आहे. नागपूर शहरात साजरे होणारे प्रत्येक उत्सव हर्षोल्हासात आणि शांततेत साजरे व्हावे, भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. महानगरपालिका भाविकांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.


भाविकांसाठी बसची व्यवस्था
अंबाझरी तलाव घाटावर येण्याऱ्या भाविकांसाठी हिंगणा आय.सी. चौकातून २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता आणि २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता दोन-दोन विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. भाविकांना तलाव घाटावर येण्यासाठी जुना पारंपरिक मार्गासह विवेकानंद स्मारकाच्या दिशेने आणि अंबाझरी उद्यानाच्या मुख्य द्वाराच्या दिशेने प्रवेश देण्यात येईल. पार्किंगची व्यवस्था अंबाझरी मुख्य द्वाराच्या बाजूला करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

– राजीव रंजन कुशवाहा