पुणे: नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणाच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांनी फक्त निवडणूक लढवून दाखवावी असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
महायुतीच्या जागावाटपात अजूनही नाशिक मतदारसंघातून कोणता नेता लोकसभेच्या मैदानात उतरणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र याठिकाणाहून छगन भुजबळ निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र अजित पवार गटाने भुजबळ यांना नाशिकच्या मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी भुजबळांना घेरले आहे.
मनोज जरांगे आज पुण्यातील देहू येथे आले होते. त्यांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी भुजबळांबद्दल जास्त काही विचारू नका,असे सांगितले. तसेच लोकसभा लढवायचा भुजबळांचा अंतिम निर्णय होऊ द्या मग सांगतो,असेही जरांगे म्हणाले.
राज्यभरात कोणत्या उमेदवारांना निवडून द्यायचे हे मराठा समाजाने ठरवावे, पण नाशिकमधून भुजबळ उभे राहिले तर काय भूमिका घ्यायची हे त्याच वेळी लगेच सांगणार असल्याचे जरांगे म्हणाले.