Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Thu, Jun 14th, 2018

अटक होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं – छगन भुजबळ

मला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते. त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. भ्रष्टाचार झालाच नाही तर माझ्या अटकेचा प्रश्न येतो कुठे, अशी माझी समजूत होती असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले. जवळपास दोन वर्षे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात तुरूंगात असलेले भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले असून खटल्याच्या सुनावणीमध्ये खरे काय ते बाहेर येईल आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, असे त्यांनी ठासून सांगितले.

काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळा प्रकरणात मला अटक झाली असे सांगताना माझा काहीही संबंध नसताना मला अटक केल्याचा दावा भुजबळांनी केला. भुजबळ म्हणाले की, अंधेरीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये चमणकर नावाच्या कंत्राटदाराला काम मिळाले होते. हा कंत्राटदार मी नेमलेला नाही. त्या झोपु योजनेशी माझा संबंध नाही. त्यावेळी या झोपडपट्टीमध्ये एक टेस्टिंग ट्रॅक होता, या ट्रॅकच्या संदर्भात त्या कंत्राटदाराला एफएसआय देण्यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. माझा संबंध फक्त त्या ट्रॅकसंदर्भात आहे. कारण तेवढेंच फक्त सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित होते. त्याचवेळी महाराष्ट्र सदनाचे व आरटीओच्या अंधेरीतील इमारतीचे काम रखडले होते.

एफएसआय देण्याच्या बदल्यात ही दोन बांधकामे करून देण्याचे त्या कंत्राटदाराने मान्य केले आणि अत्यंत सुंदररीत्या ते पूर्णही केले.
मात्र, ज्या मूळ ट्रॅकची किंमत 40 कोटी रुपये नव्हती, त्याच्या एफएसआयच्या बदल्यात दोन सुंदर इमारती त्याने बांधून दिल्या. या सगळ्यात सरकारचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. असे असताना 8000 कोटींचा घोटाळा कुठून आला, हेच समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले.

तरी हा घोटाळा 800 कोटींचा असल्याचे कागदपत्रे सांगतात. मात्र तेही सिद्ध होऊ शकत नाही. कारण असा काही घोटाळाच नाही असे भुजबळ म्हणाले. मी महाराष्ट्र सदन सुंदर होण्यासाठी प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले. तसेच, मी कुठल्याही कंपनीत संचालक किंवा शेअर होल्डर नाही, असे त्यांनी सांगितले. काही अधिकार्‍यांनी एकतर त्यांना नीट प्रकरण समजत नसावे किंवा त्यांना कुणीतरी वरून सांगितले असावे असा आरोप भुजबळ यांनी केला.

Trending In Nagpur
Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145