Published On : Mon, Feb 11th, 2019

छेज नृत्य स्पर्धा सिंधी भाषेशी नव्या पिढीची नाळ जोडण्याचे प्रभावी माध्यम : पालकमंत्री

Advertisement

अकोट, जुली संघ पुरूष व महिला गटातून प्रथम पारितोषिकाचे मानकरी

नागपूर: सिंधी संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीसह जुळेलेल्या परंपरांचे जतन करण्यासाठी नव्या पिढीने या संस्कृतीचा वारसा पुढे चालविण्याची गरज आहे. या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीच्या जवळ आणून त्याचा परिचय करून देण्याच्या उददेशाने करण्यात आलेले अखिल भारतीय सिंधी छेज नृत्य स्पर्धा हे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका व भारतीय सिंधु सभा यांच्या वतीने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित भारतीय सिंधी छेज नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. मंचावर महापौर नंदा जिचकार, आमदार गिरीश व्यास, आमदार डॉ. मिलींद माने, स्थायी समिती सभापती व स्पर्धेचे संयोजक वीरेंद्र कुकरेजा, नगरसेविका प्रमिला मथरानी, गुजरातच्या माजी मंत्री माया कोडवानी, राष्ट्रीय सिंधी भाषा परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष घनशाम कुकरेजा, भारतीय सिंधु सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लधाराम नागवानी, अजीत मन्याल, दिनेश टहिलानी, मुरलीधर माखीजा, डॉ. विंकी रुघवानी, विदर्भ सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष व स्पर्धेचे सहसंयोजक राकेश कृपलानी, डॉ. वंदना खुशलानी, प्रताप मोटवानी, विजय केवलरामानी, सतीश आनंदानी, किशोर लालवानी, अशोक केवलरामानी, किसन लालवानी, आशू तुलसानी, गोपाल खेमानी, मिडास टच इव्हेंटचे प्रशांत सपाटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार, प्रसारासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. सिंधी छेज नृत्य हा लुप्त होण्याच्या मार्गावरील नृत्य प्रकार या स्पर्धेच्या माध्यमातून पुनर्जीवित होत आहे. आजपर्यंत देशातच नव्हे तर जगात पहिल्यांदाच नागपूरात या स्पर्धेचे आयोजन ही गौरवास्पद बाब असल्याचेही ते म्हणाले.

सिंधी संस्कृतीच्या संवर्धनासाठी सरकार नेहमी समाजाच्या सोबत आहे. या संस्कृतीसाठी शासनाने पुढाकार घेत सिंधी आर्ट गॅलरी तयार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून लवकरच त्याचे भूमीपूजन करण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

महापौर नंदा जिचकार यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबददल स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे अभिनंद केले. अशा आयोजनाबददल मनपा सदैव सहकार्य करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

स्पर्धेत पुरूष गटात अकोट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर बडोदा स्टाईल व सिंधु शाक्य संघ उल्हासनगर यांनी संयुक्त दुसरे आणि चंदूराम सेवा मंडळ संघाने तिस-या स्थानावर बाजी मारली. महिला गटात जुली उल्हासनगर संघाने प्रथम, अहमदाबाद एमजी संघाने द्वितीय व सिंधु सहेली मंडळ नागपूर संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक व धनादेश प्रदान करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून अमरावतीचे ‍नितीन आसुदानी, बडोदाच्या पूजा लालवानी व मुंबईच्या आशू आलीमचंदानी यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सिंधी भाषा परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष घनशाम कुकरेजा यांनी केले. संचालन तुलसी सेठीया यांनी तर आभार स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मानले. यावेळी देशातील विविध भागातून आलेले स्पर्धक मोठया संख्येत उपस्थित होते.