Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, May 12th, 2018

  शिवसृष्टी प्रकल्पासाठी धनादेश सुपुर्द

  पुणे : आंबेगाव बुद्रुक येथे साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट तर्फे सीएसआर अंर्तगत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

  यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार जगदीश मुळीक, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्टचे विश्वस्त जगदीश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी नितीन गडकरी म्हणाले, शिवसृष्टीनजीक वडगाव ते कात्रज चौक या उड्डाण पुल उभारणीसाठी १३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच कात्रज येथील शिवसृष्टी मार्गे जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी रुंदीकरण करण्यात येणार असून या रस्त्यासाठी ११६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी सेवारस्ते व पादचारी मार्गही बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

  आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येणारा हा प्रकल्प २१ एकर जमिनीवर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ३०२ कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी आतापर्यंत ४२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सरकार वाड्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील भवानी माता स्मारक, राजसभा, रंगमंडळ व तटबंदी चे काम सुरु आहे. तिसऱ्या टप्यात माची, बाजारपेठ, आकर्षण केंद्र, कोकण, प्रेक्षागृह, अश्वशाळा याचे काम करण्यात येणार आहे.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ व शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे विश्वस्त श्री. कदम यांनी केले.

  प्रारंभी साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीची चित्रफित दाखविण्यात आली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145