
नागपूर – महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना संक्रांतीपूर्वी 3 हजार रुपये मिळणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणताही लाभ अग्रिम स्वरूपात देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिल्याने एकत्रित रक्कम देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. परिणामी, लाभार्थी महिलांच्या खात्यात सध्या फक्त डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात शासनाच्या कोणत्याही योजनांमध्ये अतिरिक्त किंवा आगाऊ लाभ देण्यास मनाई असल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा निर्णय राज्यातील सर्व महापालिका निवडणूक क्षेत्रांना लागू राहणार आहे.
एकत्रित हप्त्याच्या घोषणेला आक्षेप-
डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा लाभ एकाच वेळी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता लागू असताना असा लाभ देता येईल का, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने या प्रकरणाची चौकशी करत शासनाकडून स्पष्टीकरण मागवले.
तक्रारींची दखल-
‘मकर संक्रांतीची मोठी भेट, 14 जानेवारीपूर्वी 3000 रुपये खात्यात जमा’ अशा बातम्यांमुळे आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने या योजनेबाबत घेतलेल्या निर्णयाची कायदेशीरता तपासली.
आचारसंहितेचा आधार-
मुख्य सचिवांनी आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार, 4 नोव्हेंबर 2025 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. या नियमांनुसार, आधीपासून सुरू असलेल्या योजनांचे नियमित लाभ देता येतात; मात्र नवीन किंवा अग्रिम स्वरूपातील लाभ देण्यास मनाई आहे.
नियमित हप्ता सुरू, आगाऊ लाभास बंदी-
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचा नियमित व प्रलंबित लाभ देण्यास हरकत नाही. मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता आचारसंहिता काळात आगाऊ देणे शक्य नाही. तसेच या काळात नवीन लाभार्थी जोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
या निर्णयामुळे सध्या लाभार्थी महिलांना केवळ डिसेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार असून, उर्वरित रक्कम आचारसंहिता संपल्यानंतरच दिली जाणार आहे.








