मनपरिवर्तन करा, मतपरिवर्तन होईल : पालकमंत्री

Advertisement

व्याहाडपेठ, कोंढाळी, पारडसिंगा, खैरगाव, बेलोना
सावरगाव, वलनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकी

नागपूर: भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे मनपरिवर्तन करा, मतपरिवर्तन होईलच, असा विश्वास व्यक्त करीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवा. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय लोकांमध्ये सांगा, असे असे आवाहन केले.

काटोल विधानसभा मतदारसंघातील व्याहाडपेठ, कोंढाळी, पारडसिंगा, खैरगाव, बेलोना, सावरगाव, वलनी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते संबोधित करीत होते. या सर्व बैठकीना माजी आ. अशोक मानकर, किशोर रेवतकर, चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, उकेश चव्हाण आदी उपस्थित होते.

सत्ता हे जनकल्याणासाठी मिळालेले साधन आहे. मतांतून त्या साधनाला ताकद देण्याचे काम होते. या साधनाचा उपयोग समाजातील गरीब, शोषित माणसासाठी व्हावे, यासाठी योग्य आमदारांची निवड करणे आपल्या हाती असल्याचे लोकांना सांगा. आपला कार्यकर्ता हा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एक मत सर्व योजना येथे आणू शकते, एक मत अपेक्षित बदल घडवू शकते आणि एक मत देशाला अनेक वर्षे माघारीही नेऊ शकते असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी 100 दिवसात काश्मीर भारताशी जोडून दाखवले. ही किमया आपल्या मतांनीच केली आहे. आजपर्यंत 70 वर्षात जे घडले नाही ते मोदींनी 100 दिवसात करून दाखविले, असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. समाजातील आर्थिक दुर्बल घटक हे आमचे लक्ष्य आहे. गरीब माणूस मजबूत झाला पाहिजे. शेतकरी मजबूत झाला आहे. यासाठीच आपल्या शासनाने शेतकर्‍यांसाठी अनेक योजना आणल्या. शेतकर्‍याला कर्जमुक्त केले. 27 हजार कोटी वीज बिलाची थकबाकी असताना एकाही कृषीपंपाचे कनेक्शन कापले नाही. गरीबांना, शेतकर्‍यांना मदत करण्याचे या शासनाचे धोरण आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.