Published On : Fri, Sep 14th, 2018

लठ्ठपणापासून सुटकेसाठी मानसिकता बदला : डॉ. जगन्नाथ दीक्षित

Advertisement

नागपूर : लठ्ठपणा ही जगातील मोठी समस्या आहे. जगभरातील लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. एका सर्वेक्षणानुसार भारतात ९८ लाख पुरूष तर २ कोटी महिला लठ्ठपणाचे शिकार आहेत. मधुमेहाचे कारणही लठ्ठपणाच आहे. लठ्ठपणाचे कारण अनेक असले तरी तो कसा दूर करायचा यासाठी स्वत:ची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कुणीतरी दुसरा येऊन आपला लठ्ठपणा दूर करेल ही मानसिकता आपण जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत लठ्ठपणा दूर करता येणार नाही, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

ते नागपूर महानगरपालिका, सप्तक व माहेश्वरी पंचायतच्यावतीने डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘लठ्ठपणा व मधुमेह प्रतिबंधाचा सोपा उपाय’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य समिती सभापती मनोज चापले, उपायुक्त रविंद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त राजेश कराडे, आरोग्य अधिकारी अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. जगन्नाथ दीक्षित पुढे म्हणाले, अनुवांशिकता, वय, सामाजिक व आर्थिक स्थिती, जेवण बनविण्याच्या पद्धती, शिक्षण, मद्यपान, धुम्रपान अशा विविध कारणांमुळे वजन वाढतो अशी आपली धारणा आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज जगात २४७ प्रकारचे ‘डायट प्लॅन’ आहेत. मात्र एका वेळेसाठीच ते ठिक वाटतात. आज आपली मानसिकता ‘शॉर्ट कट’ची झाली आहे. त्यामुळे वजनही झटपट कमी व्हावे असेच आपल्याला वाटते. मात्र त्यासाठी महागडे ‘डायट प्लॅन’ किंवा इतर बाबतीत पैसा खर्च करण्याची गरज नाही. रक्तात इन्सुलिनचे असते त्यामुळे लठ्ठपणा वाढतो व लठ्ठपणामुळे मधुमेह होतो. त्यामुळे लठ्ठपणा कमी करणे हे सर्वप्रथम आवश्यक आहे. विना पैशानेही लठ्ठपणा घालविता येतो. यासाठी फक्त आधी मनाची तयारी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. श्रीकांत जिचकारांमुळे प्रेरणा मिळाली
लठ्ठपणा घालविण्यासाठी इतरांप्रमाणे मी सुद्धा विविधप्रकारच्या कसरती केल्या. कधी अमुक डायट प्लॅन, उपास, तर कधी अमुक एखाद्या आश्रमात पैसे खर्च केले. मात्र त्यातून काही फायदा झाला नाही. त्यानंतर डॉ. श्रीकांत जिचकार यांचे या विषयावरील व्याख्यान पाहिले आणि आयुष्याला दिशा मिळाली. ‘वजन कमी करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिवसातून दोनदा जेवण करा, यादरम्यान तोंड फक्त बोलणे आणि पाणी पिण्यासाठीच उघडा’, हा डॉ. जिचकारांचा सल्ला जीवन बदलविणारा ठरला. या सल्ल्यामध्ये कोणतेही पत्थ्य नाहीत, की काही ‘डायट प्लॅन’ही नाही. त्यामुळे स्वत:तील बदल पाहून इतरांनाही हा मोफत सल्ला देण्याची प्रेरणा आल्याचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी सांगितले. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या प्रेरणेमुळेच हे कार्य हाती घेता त्यामुळे डॉ. जिचकार यांच्या नागपुरात मधुमेह मुक्त केंद्र सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर महानगरपालिकेसह, सप्तक व माहेश्वरी पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.