Published On : Tue, Jul 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महायुतीतील सर्व उमेदवारांना ताकद देणार- चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

निवडणुकीच्या वेळी महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांना भाजपा आपल्या उमेदवाराला जेवढी ताकद देईल त्यापेक्षाही अधिक ताकद महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवाराला देईल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला. २०२४ मध्ये मोदीजी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील ४५ पेक्षा अधिक खासदार असतील.

रायगड, बारामती, शिरूर आणि शिर्डी यांच्यासह हातकंगणले, कोल्हापूर, माढा , सातारा या लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज त्यांनी पुणे येथे घेतली. पत्रकारांना त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा बुथस्तरापर्यंत संपूर्ण कार्यक्रमाची रचना करीत आहोत. लोकसभा प्रवास योजनेत ५०० पेक्षा अधिक पदाधिकारी व त्यांची टीम काम करणार आहे. त्यासाठी संपर्क से समर्थन व नवमतदार नोंदणी केली जात आहे. राज्यातील व केंद्रातील मंत्री आगामी २ महिन्यात राज्याचा दौरा करतील. राजकीय व विकासात्मक तयारी केली जात आहे. जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम केले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर केली. तर आगामी वर्षभरात ५० हजार रुग्णमित्र तयार केले जातील. मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी मतदार साथ देत असल्याचे त्यांनी सांगितले.

• जागा वाटपाचा अधिकार केंद्रीय बोर्डाला
उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये आले तेव्हा ते सर्व बाबींचा विचार करून आले आहेत. महायुतीवर शंका घेण्याचे कारण नाही, महायुती कमजोर होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत. जागा वाटपाचा संपूर्ण अधिकार हा केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. राज्यातील तिन्ही नेते व केंद्रीय संसदीय बोर्ड उमेदवार ठरवितील.

• महायुती वर्षानुवर्षे असेल
देशातील जनतेला मोदीजी पंतप्रधान म्हणून हवे आहेत, मोदीजीच्या नवभारताच्या संकल्पाला साथ देण्याकरिता मतदान केंद्रावर जाऊन मतदार कमळाचेच बटन दाबणार आहेत. आम्हीही त्यासाठी काम करीत आहोत. भाजपासोबतची महायुती वर्षानुवर्षे चालणार आहे. चिन्हाचा कोणताही वाद नाही असेही श्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

• २०२९ पर्यंत कॉंग्रेसला स्कोप नाही
कॉंग्रेसची अवस्था वाईट आहे, कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेता ठरविता येत नाही, त्यासाठी ब्लड टेस्ट करतील. त्या पक्षात प्रचंड असंतोष आहे. कॉंग्रेसमध्ये केव्हाही कोणताही स्फोट होऊ शकतो. २०२९ पर्यंत कॉंग्रेसला कोणताही स्कोप नाही हे त्यांना माहिती आहे.