Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 22nd, 2020
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  संघाच्या अंगणात जाऊन चंद्रशेखर आझाद यांचं संघप्रमुखांना खुलं आव्हान

  भीम आर्मी संघटनेचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना निवडणूक मैदानात येऊन निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे.

  नागपूर: भीम आर्मी संघटनेचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना निवडणूक मैदानात येऊन निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे (Chandrashekhar Azad challenge Mohan Bhagwat). यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकासह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. ते आज (22 फेब्रुवारी) नागपूरमधील भीम आर्मी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. चंद्रशेखर आझाद सुरुवातीला तिरंगा घेवून मंचावर आले. यानंतर त्यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून आपल्या भाषणाला सुरुवात केली.

  आपल्या भाषणात चंद्रशेखर आझाद म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांनी देखील लोकांचा सन्मान ठेवावा, त्यानंतरच त्यांनी माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा करावी. देश कुणाच्या बापाचा नाही. इथे दोन विचारांचा संघर्ष आहे. हे (हेडगेवार स्मारकाकडे बोट दाखवत) मनुस्मृती मानतात, आम्ही संविधान मानतो. संघप्रमुखांनी मैदानात येऊन निवडणूक लढवावी.

  लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढवू नये. स्वतः मैदानात यावं. आरएसएसच भारतीय जनता पक्ष चालवत आहे.”

  मोहन भागवत म्हणत होते की आरक्षणावर वादविवाद व्हायला हवा. त्यांनी यावं आणि आमच्याशी आरक्षणाबाबत वादविवाद करावा. इंग्रजांसमोर माफी मागितली ते महापुरूष नाहीत. संघाचे लोक तिरंगा यात्रा काढतात, मग ते संघ मुख्यालयावर तिरंगा का लावत नाही? असाही प्रश्न आझाद यांनी उपस्थित केला. यावेळी आझाद यांनी संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त भीम आर्मीकडून 23 फेब्रुवारीला ‘भारत बंद आंदोलन’ करणार असल्याची घोषणाही केली.

  न्यायालय मोठी ताकद आहे. जनतेला वाटलं म्हणून आजचा मेळावा शक्य झाला. तिरंगा सर्वत्र फडकणार, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. जे म्हणत होते या देशावर राज करु, ते पण गेलेत. दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्यांना माझा सलाम आहे. हे आंदोलन स्वतंत्र भारतातलं सर्वात मोठं आंदोलन आहे. संघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल. मनूस्मृती आणि संविधानाच्या लढाईत संविधानच जिंकणार आहे, असंही आझाद म्हणाले. यावेळी आझाद यांनी आमचा पंतप्रधान पण होणार आणि अनेक राज्यांमध्ये सरकारही येणार, असाही दावा यावेळी केला.

  सरकारं बदलतात, पण विचार बदलत नाही. बहुजन समाजाची मतं सर्वांना हवी आहेत, पण आपल्याविषयी कोणी बोलणार नाही. गेल्यावेळी आलो तेव्हा भाजपचं सरकार होतं. मला 3 दिवस हॉटेलमध्ये बंद करुन ठेवण्यात आलं. आता सरकार बदललं, पण परिस्थिती नाही. देशात दलित, शीख इत्यादी अल्पसंख्याकांना वेगळं करण्याचं षडयंत्र सुरु आहे. सीएए-एनआरसी त्याचाच एक भाग आहे. कितीही लाठ्या मारल्या तरीही आम्ही देशाला वाचवण्यासाठी पुढे येणार आहोत, असंही चंद्रशेखर आझाद यांनी नमूद केलं.

  दरम्यान, सुरुवातील भीम आर्मीच्या कार्यकर्ता मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, चंद्रशेखर आझाद यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर या मेळाव्याला परवानगी देण्यात आली. आझाद यांनी मेळाव्यासाठी आठ तास मागितले होते, मात्र, न्यायालयाने तीनच तासांची परवानगी दिली. यावर आझाद यांनी तीन तास पुरेसे असल्याची प्रतिक्रिया दिली.

  Stay Updated : Download Our App

  Mo. 8407908145
  0Shares
  0