Published On : Fri, Nov 1st, 2019

अवकाळी पावसामुळे पिकांची हानी शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी भाजपा शिष्टमंडळाचे पालकमंत्र्यांना निवेदन

नागपूर: अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या धान, सोयाबीन, कापूस, संत्रा, मोसंबी, भाजीपाला आदी पिकांची प्रचंड हानी झाली आहे. या हानीची चौकशी करून शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांनी आणि आमदारांनी एक निवेदन आ. गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एक पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, अरविंद गजभिये, चरणसिंग ठाकूर, विकास तोतडे, आनंदराव राऊत, रमेश मानकर आदी उपस्थित होते. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, मोसंबी, बागाईतदार, भाजीपाल्याचे उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची चौकशी झाल्यानंतर अजूनपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या सर्व अडचणीतून शेतकरी बाहेर निघत नाही तोच पुन्हा अवकाळी पावसामुळे शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेले पिक हातचे गेले.

त्यामुळे धान, सोयाबीनला 20 हजार रुपये, कापसाला 30 हजार रुपये हेक्टरी मदत तर संत्रा, मोसंबीला नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच आतापर्यंत स्थगित असलेले सर्व पीककर्ज व सध्या घेतलेले कर्ज सरसकट माफ कण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.