Published On : Sat, Aug 13th, 2022

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष, येथे घराणेशाही नाही बावनकुळे यांच्या नागरी सत्कारात ना. गडकरी

Advertisement

नागपूर: भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे आमदाराच्या पोटातून आमदार, मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री निर्माण होत नाही. लहान कार्यकर्त्याला मोठ्या पदावर जाण्याची संधी या पक्षातच मिळते. येथे घराणेशाही नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजपा प्रदेशाध्यपदी नियुक्ती झाल्यानिमित्त आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार ना. गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आला. त्याप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला खा. रामदास तडस, माजी खा. अजय संचेती, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. रामदास आंबटकर, डॉ. राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये व शहर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले- बावनकुळे यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने पक्षात मेहनत करून ही पदे प्राप्त केली आहे. स्वकर्तृत्वामुळेच त्यांना वेळोवेळी संधी मिळत गेली. निवडणुकीत जनतेने शिफारस केली तरच कार्यकर्त्यांना तिकिट मिळेल, अन्यथा मिळणार नाही. बावनकुळे यांचे जीवन संघर्षमय होते. भाजपाची जिल्ह्यात स्थिती चांगली नसताना त्यांनी पक्ष मजबुतीचे काम केले. स्वत:च्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी कामठी मतदारसंघ मजबूत केला, असेही ते म्हणाले.

प्रत्येक पक्षात दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. झोकून देऊन काम करणारे व बोटावर मलम लावणारे कार्यकर्ते असतात. पण बावनकुळे हे झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- ऊर्जा खात्याचे मंत्री असताना त्यांनी चांगले काम केले. शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचा बॅकलॉग त्यांनी कमी केला. नागपूरच्या अडचणीत असलेल्या योजना मंजूर करवून आणल्या. आताही त्यांनी शहरासाठी प्रशासकीय काम करावे. ज्या नेतृत्वात ‘ओनरशिप’ नाही असे नेतृत्व कधीही यशस्वी होऊ शकत नाही. बावनकुळे मात्र ‘ओनरशिप’ घेऊन काम करीत असतात. कार्यकर्त्यांना, त्यांच्या कुुटुंबियांना सांभाळण्याचे काम त्यांनी यशस्वी केले आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- तिकीट मिळाले नाही तरी पूर्ण ताकदीने पक्षासाठी त्यांनी काम केले. या परीक्षेत ते यशस्वी झाले. कार्यकर्त्यांमध्येही बावनकुळे आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. पक्षाने त्यांना पक्षाची सेवा करण्याची संधी दिली आहे. आगामी काळात त्यांच्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. पक्ष मजबुतीचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे, याकडही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.