
चंद्रपूर: जिल्ह्यात उघडकीस आलेल्या किडनी विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे याच्या किडनी विक्रीशी संबंधित या प्रकरणात स्वतःला डॉक्टर म्हणून भासवणाऱ्या आरोपीला रविवारी रात्री सोलापूर येथून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामकृष्ण मल्लेशम सुंचू असे आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून रामकृष्ण हा डॉक्टर नसून किडनी तस्करी करणारा एजंट असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस तपासानुसार, वर्ष 2018 मध्ये आरोपीने पैशांच्या बदल्यात कंबोडियामध्ये स्वतःची किडनी विकली होती. त्यानंतर कंबोडियातील काही डॉक्टरांनी भारतातून अधिक किडनी डोनर आणण्याची मागणी करत प्रत्येक डोनरमागे एक लाख रुपयांचे कमिशन देण्याचे आमिष दाखवले होते.
याच लालसेपोटी रामकृष्ण भारतात परतला आणि किडनी तस्करीचे रॅकेट उभे केले. या रॅकेटसाठी त्याने सोशल मीडियावर ‘किडनी डोनर’ या नावाने फेसबुक खाते उघडले आणि आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पैशांचे आमिष दाखवून किडनी विक्रीस प्रवृत्त केले. या जाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुळे अडकला.
कर्जबाजारी रोशनला पैशांचे आमिष दाखवून कंबोडियाला नेण्यात आले, तेथे त्याची किडनी काढण्यात आली. हा संपूर्ण प्रकार केवळ आर्थिक लाभासाठी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी आरोपी रामकृष्ण याला सोलापूरमधून अटक करून सोमवारी ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 25 डिसेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि एसआयटीकडून सुरू असून, या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटमध्ये आणखी आरोपी सामील असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.








