Published On : Tue, Oct 1st, 2019

नागपूर जागांसाठी शिवसेनेने आग्रह धरला नाही: पाटील

कोल्हापूर: सात ते आठ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत, असं सांगतानाच शिवसेनेनेही या जागांसाठी आग्रह धरला नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant-patil)यांनी स्पष्ट केलं. तसेच येत्या ४ ऑक्टोबर रोजीच युतीत कुणाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भाजप शिवसेना युती झाली असल्याने अनेकजण नाराज झाले आहेत, रडले आहेत, चिडले आहेत. जिवंत माणसंच रियॅक्ट होतात. काहीजण चिडून बंडखोरी करतील, अर्ज दाखल करतील. पण त्यांची पक्षावर श्रध्दा असल्याने सात तारखेपर्यंत सर्व बंडखोर माघार घेतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. १९८२ पासून पुण्याचे माझे नाते असल्याने पुणेकर मला परका मानत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

कोल्हापूरला फक्त भाजपला दोनच जागा मिळाल्या आहेत, यावर चर्चा होते हे बरोबर नाही, अशी खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. ‘युतीमध्ये जागा वाटप करताना फॉर्म्युला ठरला आहे. सात ते आठ जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. नागपूर आणि पुणे जिल्ह्यात सर्व जागा भाजपला मिळाल्या आहेत. पण शिवसेनेनेही त्यासाठी आग्रह धरला नाही. जागा वाटपात न्याय अन्याय होत राहतो.

सातारा जिल्ह्यात भाजपला आठ पैकी पाच तर सांगली जिल्ह्यात आठ पैकी चार जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. गेल्यावेळी कागल आणि चंदगड मतदार संघात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे या जागा त्यांना मिळाल्या आहेत. कागलमध्ये समरजित घाटगे यांनी चांगली तयारी केली होती हे मला मान्य आहे. त्यांच्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले. पण आमचे सर्व कार्यकर्ते चांगले असल्याने जागा वाटपाचा निर्णय ते मान्य करतील. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या.

जागा वाटप ४ तारखेला कळेल
शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे. दोन्ही पक्षांना जागा किती हे आता सांगता येणार नाही. चार ऑक्टोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हे स्पष्ट होईल, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले. सात तारखेला राज्यातील सगळे बंडोबा थंड होतील. कोथरूड जितकं मला माहित आहे, तितकं कोणालाच माहीत नाही, मला कोथरूडकर बाहेरचा म्हणणार नाहीत. युतीचा फॉर्म्युला लोकांना कळण्याची गरज नाही. युती झाली हे पुरेसं, असं त्यांनी पुण्यातील कोथरूडमधून उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांगितलं.