Published On : Fri, Jul 19th, 2019

स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर यांनी स्वीकारला पदभार

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर यांनी शुक्रवारी (ता.१९) पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापतींच्या कक्षात आयोजित पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या.

प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, लक्ष्मी नगर झोन सभापती प्रकाश भोयर, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, स्थापत्य समिती उपसभापती किशोर वानखेडे, समितीच्या सदस्या सोनाली कडू, पल्लवी शामकुळे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक नागेश मानकर, सुनील हिरणवार, विजय चुटेले, लखन येरवार, नगरसेविका कल्पना कुंभलकर, उषा पॅलेट, स्नेहल बिहारे, वंदना भगत, निरंजना पाटील, उज्ज्वला शर्मा आदी उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी नवनिर्वाचित स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर यांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार केला. यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरातील जनतेला सेवा पुरविणे हे नागपूर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे व हे कर्तव्य योग्यरित्या पार पाडावे यासाठी झोन सभापतींसह सर्व विशेष समित्यांवर सभापतींची नेमणूक करण्यात आली आहे. स्थापत्य समिती ही सुद्धा मनपामधील इतर समित्यांप्रमाणे महत्वाची समिती आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायीक अनुभव पाठीशी असलेल्या अभय गोटेकर यांच्याकडे समितीची धुरा सोपवून उत्तम निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या अनुभव आणि विषयातील सुक्ष्म अभ्यासाचा फायदा जनतेच्या हितासाठी, जनतेला सुविधा मिळवून देण्यासाठी करण्यात यावे, असे मत यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केले.

कर आणि संपत्ती हे दोनच मनपाच्या उत्त्पन्नाचे साधन आहेत. त्यामुळे स्थापत्य या महत्वपूर्ण समितीमध्ये कार्य करताना मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी करता येणा-या उपाययोजनांकडेही विशेष लक्ष द्या. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात मनपामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांचा आढावा घेउन त्या बाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही आवाहन महापौरांनी केले.

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्य करा : आमदार सुधाकर कोहळे
नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या सहकार्याने सर्वत्र चांगले काम सुरू आहेत. स्थापत्य समिती ही मनपाची अत्यंत महत्वाची समिती आहे. व्यवसायाने बिल्डर असलेल्या अभय गोटेकर यांच्या अनुभवाचा फायदा समितीच्या माध्यमातून जनतेला होणार आहे. सर्वांना सोबत घेउन समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्य करा, असे आवाहन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले. शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतानाच सामान्य जनतेसाठी अडसर ठरणा-या बाबी लक्षात घ्या याशिवाय मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी काय चांगले करता येईल याचा अभ्यास करा, आपले अनुभव, कौशल्य, बुद्धिमत्तेचा लाभ शहरातील प्रत्येक नागरिकाला पोहोचविला जावा यासाठी विशेष कार्य करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

समितीमार्फत नागरिकांच्या सुविधेसाठी कार्य करणार : अभय गोटेकर

स्थापत्य समितीचा सभापती म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. नागरिकांना बांधकाम करताना नगर रचना विभागाच्या अनेक नियमांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. समितीच्या माध्यमातून हे नियम शिथील करून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी कार्य करणार, असे प्रतिपादन नवनिर्वाचित समिती सभापती अभय गोटेकर यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी केले तर आभार स्थापत्य समितीचे उपसभापती किशोर वानखेडे यांनी मानले.