Published On : Mon, May 28th, 2018

अर्थ डे नेटवर्क पुरस्काराचे प्रमाणपत्र महापौर, आयुक्तांकडे सुपूर्द

Advertisement

नागपूर: पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण ४८ शहरांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नागपूर शहराचा समावेश विजेत्या पहिल्या दहा शहरांमध्ये झाला. अर्थ डे नेटवर्क तर्फे नुकताच हा पुरस्कार प्राप्त झाला. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटजी, सुरभी जैस्वाल यांनी हा पुरस्कार महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे, जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे उपस्थित होत्या. महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन नागपूर महानगरपालिकेसोबत वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीसंदर्भात उपक्रम राबवित असतात.


नदी स्वच्छता मोहीम, ऊर्जा बचतीसाठी पोर्णिमा दिवस, शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान, ओला आणि सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, पर्यावरणपूरक गणेशोत्सवअंतर्गत तलाव संरक्षण, हरितम्‌ नागपूर (वृक्षारोपण) आणि पर्यावरण शिक्षण आदी पर्यावरणाशी संबंधित उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमुळे नागपूरकरांमध्ये ऊर्जा बचत, स्वच्छता अभियान आणि पर्यावरणासंबंधी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशा उपक्रमांमध्ये नागपूर महानगरपालिका नेहमीच सोबत राहील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी दिला.