
नागपूर – आगामी NEET-UG पुनर्परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत परीक्षेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीत शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)चे महासंचालक उपस्थित होते. परीक्षेदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये, संभाव्य त्रुटी आधीच ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली.
दरम्यान, सोशल मीडियावर विशेषतः टेलिग्राम चॅनेल्स आणि काही अज्ञात ऑनलाइन ग्रुप्समार्फत ‘पेपर लीक’च्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात असल्याबद्दल सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मेटा, गुगल आणि टेलिग्रामच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत या फेक नेटवर्क्सवर नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परीक्षांपूर्वी अनेक चॅनेल्स बनावट प्रश्नपत्रिका, क्लिकबेट पोस्ट आणि दिशाभूल करणारे दावे करून विद्यार्थी व पालकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करतात. काही लिंकद्वारे वापरकर्त्यांना बोगस ग्रुप्स आणि ऑटोमेटेड बॉट्सकडे वळवले जात असल्याचेही समोर आले आहे.
गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालात काही संशयित चॅनेल्स मर्यादित मोबाईल क्रमांकांच्या आधारे चालवले जात असल्याचे नमूद करण्यात आले असून, यामागे संघटित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी अशा नेटवर्क्सचा शोध घेऊन तातडीने ब्लॉक व हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, परीक्षांबाबत खोटी माहिती पसरवणे, फेक पेपर शेअर करणे किंवा अफवा पसरवून गोंधळ निर्माण करणे यावर कठोर कारवाई केली जाणार असून संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल होऊ शकतात.








