Published On : Fri, Sep 11th, 2020

केंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा ; भरीव मदतीची मागणी

नागपूर : गेल्या महिण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले.

विभागीय कार्यालयांमध्ये दुपारी बारा वाजता अधिकाऱ्यांकडून झालेल्या पुराच्या आकडेवारी संदर्भातील माहिती घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्याला प्रथम भेट दिली.

पुराच्या तडाख्याने शेतकरी व गावकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची व्याप्ती आणि तीव्रता त्यांच्या लक्षात आली. कामठी तालुक्यात सोनेगाव येथे त्यांनी आज भेट दिली. या पथकामध्ये केंद्रीय पथकातील महेंद्र सहारे, एस.एस.मोदी आणि आर. पी. सिंग यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व अधिनस्थ अधिकारी तसेच महसूल विभागाचे या भागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मध्यरात्रीपासून कन्हान नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मौजे सोनेगाव राजा येथील 155 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, 354 घरांपैकी तब्बल 114 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व पायाभूत सुविधायुक्त ठिकाणी सोनेगावचे पुनर्वसन करण्याची मागणी केंद्रीय पथकाकडे केली आहे.

29 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून नदीचे पाणी गावात आणि शेतीत शिरले होते. 9305, 9560 धानाचे वाण चांगले उत्पादन मिळत होते. मात्र आता उतारा कमी येत असल्याचे शेतकरी गजानन झोड यांनी पथकाला सांगितले.

कन्हान नदीच्या पुराचे पाणी पात्र सोडून दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत पाणी पसरले होते. त्यामुळे नदीकाठावरील घरे, शेती पिके, सोयाबीन, कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सुरुवातीला धानाचे पऱ्हे निघाले नाहीत. त्यामुळे त्यांची दुबार टाकणी करावी लागली असल्याची माहिती त्यांनी पथकाला दिली.

स्थानिक प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची तपासणी करून नामदेव राऊत यांचे संपूर्ण घर पुरात वाहून गेले, तर मधुकर चौधरी यांची गाय वाहून गेल्याचे संबंधितांनी सांगितले. तर अशोक उमाजी महल्ले यांचे पूर्ण पऱ्हाटीसह शेतीचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती श्री. महल्ले यांनी दिली. तसेच नेरीचे शेतकरी गजानन झाडे यांनीही सोयाबिन, कापसाचे नुकसान झाल्याचे सांगितले.

निलज येथील सचिन राजाराम दुपारे या शेतकऱ्याच्या शेतातील पुराच्या पाण्यामुळे टमाटे, मिरची, कापूस, सोयाबीन, धानाचे नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे अगोदरच संकटात‌ सापडलेल्या शेतकऱ्याला कंपनीशी संपर्क साधला असता, कंपनी दोन बँगांचे पैसे परत करणार असल्याचे त्यांनी पथकाला संपर्क सांगितले.

काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पथकाला आपल्या समस्या सांगितल्या. पारशिवनी तालुक्यातील सिंगार दीप गावाला पुनर्वसित करावे लागणार आहे, असे जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, सरपंच सुभाष नाकाडे, उपसरपंच रवींद्र दोडके यांनी पथकाला सांगितले. 155 हेक्टर शेती बाधित तर 27 घरे पूर्णत: बाधित झाली. याठिकाणी पथकाला वीज वाहिन्यांचे खांब पडून वीजपुरवठा खंडित झाला असल्याचेही दिसून आले. परिसरात नदीकाठावरील धानाचे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इस्लामपूर माथनी या गावा दरम्यानच्या नुकसान झालेल्या पुलाची देखील यावेळी पाहणी करण्यात आली 1920 मध्ये हा पूल तयार करण्यात आला होता या पुलावरून 25 फूट वरती पाणी वाहत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या पुरामुळे 2500 लोकवस्तीच्या माथनी या गावाला देखील बरेचसे नुकसान झाले आहे.

आजच्या दौऱ्यामध्ये श्री. कुंभेजकर यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे,उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, पारशिवनीचे तहसीलदार वरूण सहारे, गटविकास अधिकारी श्री.बनमोटे आदी उपस्थित होते.

यापूर्वी केंद्रीय पथकाने विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पथकाला माहिती दिली.विभागात 34 तालुक्यातील 88 हजार 864 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून भात कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांची मोठया प्रमाणाव हानी झाली आहे. पूराच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी उर्ध्वनलिकांची नुकसान झाले. विभागात 23 हजार घरांची पडझड झाली असल्याची माहिती श्री. कुंभेजकर यांनी दिली.