Published On : Fri, Sep 11th, 2020

कस्तुरचंद पार्क संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिटरची नेमणूक करा हेरिटेज संवर्धन समितीची बैठक संपन्न

नागपूर : ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क हे नागपूर शहराचे वैभव आहे. या पार्कमधील पूरातन वास्तूचे जतन व संवर्धन करण्याकरिता येथे डागडुज्जीचे काम करणे आवश्यक असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. त्याकरिता तातडीने स्ट्रक्चरल ऑडिटरची नियुक्ती करून त्याचा अहवाल समितीपुढे सादर करा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीद्वारे संबंधित विभागांना देण्यात आले.

कस्तुरचंद पार्कच्या संदर्भात शुक्रवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या नगररचना विभागाच्या कार्यालयात हेरिटेज संवर्धन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, समितीच्या सदस्य डॉ.शुभा जोहरी, समितीचे सदस्य अर्बन डिझायनर अशोक मोखा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. भानुसे, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त पराग पोटे, महामेट्रोचे माणिक पाटील, सोलार इंडस्ट्रिज इंडिया लि.चे श्याम मुंधडा आदी उपस्थित होते.

कस्तुरचंद पार्कच्या दुरावस्थेची दखल घेउन उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. त्या अनुषंगाने ५ सप्टेंबरला स्वत: माननीय न्यायमूर्तींनी कस्तुरचंद पार्कच्या दुरावस्थेची पाहणी केली. यावेळी न्यायमूर्तींनी दिलेल्या सूचनांनुसार हेरिटेज संवर्धन समितीला कस्तुरचंद पार्कमधील हेरिटेज स्ट्रक्चर व इतर जुने बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरूस्ती संबंधात सविस्तर प्लान तयार करून त्याचा अहवाल १७ सप्टेंबरला होणा-या सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे निर्देश आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.११) समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश समितीद्वारे देण्यात आले. येत्या सोमवारपर्यंत कस्तुरचंद पार्कसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. भानुसे यांनी सांगितले. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समितीचे सदस्य अर्बन डिझायनर अशोक मोखा यांनी दिली.

कस्तुरंच पार्कच्या सौंदर्यीकरणासोबतच या ठिकाणी दैनंदिन व्यवस्थापनाचे धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. याशिवाय या ठिकाणी मनपाच्या संबंधित झोन मार्फत पोलिसांच्या सहकार्याने याठिकाणी चालणा-या बेकायदेशीर कार्याचे विरोधात सुरक्षा व्यवस्था करण्यात येणेही गरजेचे आहे. सुरक्षा भिंतीलगतच्या फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, हा भाग ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करून त्या संदर्भात मनपाचे संबंधित झोन आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कार्यवाही करावी, यासंदर्भातही निर्देश समितीद्वारे संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.