
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन ४ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत तब्बल १५ अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर-मुंबई मार्गावर सर्वाधिक ८ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नागपूर-मुंबई मार्गावर आठ विशेष फेऱ्या-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पहिली गाडी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल. दुसरी गाडी त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता सुटून ५ डिसेंबरला दुपारी ४.१५ वाजता मुंबईत दाखल होईल.
५ डिसेंबर रोजी सकाळी ७.४० वाजता सुटणारी तिसरी विशेष गाडी त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मुंबईला पोहोचेल. तर याच दिवशी सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी चौथी गाडी ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.५५ वाजता मुंबईत पोहोचणार आहे.
मुंबईहून नागपूरसाठीही विशेष व्यवस्था-
मुंबईत बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर नागपूरला परतणाऱ्या प्रवाशांसाठीही चार विशेष गाड्या उपलब्ध असतील. ६ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल.
७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुटणारी गाडी ८ डिसेंबरला मध्यरात्री १२.५५ वाजता नागपूरला दाखल होईल. त्याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता सुटणारी दुसरी गाडी ८ डिसेंबरला पहाटे ३ वाजता पोहोचेल. तर ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटणारी गाडी त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
याशिवाय दादरहून नागपूरसाठी ट्रेन क्रमांक ०१२५३ ही विशेष गाडी ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता सुटणार असून त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
विदर्भातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे-
नागपूर-मुंबई विशेष रेल्वे गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भातील विविध शहरांमधील प्रवाशांनाही या विशेष सेवांचा लाभ घेता येणार आहे.
अमरावती, कलबुर्गी आणि कोल्हापूरसाठीही विशेष ट्रेन-
नागपूर-मुंबई मार्गासोबतच कलबुर्गी, अमरावती आणि कोल्हापूर येथूनही मुंबईसाठी विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत.
कलबुर्गीहून ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ट्रेन क्रमांक ०१२४५ मुंबईसाठी रवाना होईल. या गाडीची परतीची सेवा ट्रेन क्रमांक ०१२४६ असून ती ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल. या गाड्यांना पुणे, दौंड, सोलापूर, लोणावळा, कल्याण आणि दादर यांसह विविध स्थानकांवर थांबे असतील.
अमरावतीहून ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता ट्रेन क्रमांक ०१२१८ मुंबईसाठी सुटणार आहे. तर मुंबईहून परतीची ट्रेन क्रमांक ०१२१७ ही ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता रवाना होईल. या गाड्यांना बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड आणि कल्याण येथे थांबे देण्यात आले आहेत.
कोल्हापूरहून ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता ट्रेन क्रमांक ०१४०२ मुंबईसाठी रवाना होईल. तर मुंबईहून ६ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता ट्रेन क्रमांक ०१४०१ कोल्हापूरसाठी सुटेल. या गाड्यांना सांगली, मिरज, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील.
तिकीट बुकिंगसाठी यूटीएस आणि रेलवन ॲपचा पर्याय-
या सर्व विशेष गाड्या अनारक्षित स्वरूपात धावणार आहेत. प्रवाशांना सामान्य दराने तिकीट काढता येणार असून यूटीएस प्रणाली आणि रेलवन (RailOne) ॲपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील अचूक वेळ जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा.
बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी रेल्वेची विशेष तयारी-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल होतात. विशेषतः नागपूर आणि विदर्भातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईकडे रवाना होतात. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या अनुयायांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.



