
नागपूर – मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२६ पर्यंत भाड्याव्यतिरिक्त तब्बल ५८.१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या ५१.१६ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १३.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर, जाहिराती आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांमधून हा महसूल मिळवण्यात आला.
ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेने ई-लिलावाच्या माध्यमातून ३६ कंत्राटे दिली. त्यातून वर्षाला ३२४.०३ लाख रुपयांचे परवाना शुल्क मिळणार आहे. मुंबई विभागात जाहिरातींसह ‘पोर्टर ऑन कॉल’ आणि उपनगरीय गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विक्रीची कंत्राटे देण्यात आली. कल्याण-कर्जत/खोपोली आणि कल्याण-कसारा मार्गावरील गाड्यांसाठी खाद्यपदार्थ विक्रीचे कंत्राट ४०.११ लाख रुपये वार्षिक दराने देण्यात आले.
भुसावळ विभागाने मेमू गाड्यांमधील जाहिराती, दुचाकी पार्किंग, डॉर्मिटरी, रिटायरिंग रूम, किराणा दुकान आणि डिजी लॉकरसारख्या सेवांमधून उत्पन्नाचे नवे मार्ग खुले केले. पुणे विभागाने जाहिरातीचे कंत्राट दिले, तर सोलापूर विभागाने वाडी यार्डमधील वॅगन साफसफाई, जाहिराती, किओस्क आणि मोबाईल चार्जिंग सुविधांमधून महसूल मिळवला.
नागपूर विभागानेही मोबाईल फूड व्हॅन्स, गाड्यांमधील विक्री, डिजी लॉकर आणि कर्मचारी कॅन्टीनच्या कंत्राटांतून भाडे-व्यतिरिक्त उत्पन्नात योगदान दिले आहे. ई-लिलावामुळे कंत्राट प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्पर्धात्मक करण्यावर रेल्वेचा भर आहे.




