Published On : Fri, Apr 9th, 2021

केन्द्रीय आरोग्य पथकाने केली कंटेनमेंट झोन ची पाहणी

Advertisement

नागपूर : केन्द्रीय आरोग्य पथकाने नागपुरात विविध झोनमध्ये प्रभावी कंटेनमेंट झोन, कोरोना चाचणी केन्द्र तसेच लसीकरण केन्द्रांची पाहणी केली. पथकाने कंटेनमेंट झोन मधल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे, नागरिकांना झोन मधून बाहेर जाण्यावर प्रतिबंध लावणे तथा सर्वेक्षण करणारी टीम ला बाधितांचे ऑक्सीजनचे प्रमाण तसेच टेम्परेचर तपासण्याचे निर्देश दिले. पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये ही भेट दिली. तसेच नेहरुनगर व गांधीबाग झोन अंतर्गत कंटेनमेंट झोनची पाहणी केली.

केन्द्रीय आरोग्य पथकामध्ये दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे तज्ञ डॉ. हर्षल साळवे व नागपूर एम्सचे प्रो.डॉ.पी.पी.जोशी यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत नागपूर महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नेहरुनगर झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. हरीश राऊत होते.

पथकाने प्रभाग क्र.३० मधील ‍बिडीपेठ कंटेनमेंट झोन, प्रभाग २८ मध्ये सर्वश्रीनगर दिघोरी, प्रभाग २६ मध्ये सरजू टाऊन वाठोडा कंटेनमेंट क्षेत्राचा दौरा केला. तसेच नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्र दर्शन कॉलोनी येथे कोरोना चाचणी केन्द्र व लसीकरण केन्द्राची पाहणी केली. पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता व इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कोव्हिड रुग्णांची एस.ओ.पी.बददल माहिती घेतली.

कोरोनावर नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच कोविड प्रोटोकॉलची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी व परिणामकारक करण्यावर विशेष भर देण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य पथकाकडून करण्यात आली.

श्री. राम जोशी यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी मनपा प्रशासन सर्वंकष प्रयत्नरत आहे. शहरात कोविड नियंत्रणासाठी तपासण्यावर विशेष भर देण्यात आला असून कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. कोविड रुग्णांना आवश्यक औषोधोपचार तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषोधोपचारासोबतच इतरांच्या संपर्कात येणार नाहीत यासाठी विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आला असून त्यानुसार याची अंमलबजावणी करण्यात येईल. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती पथकाला देण्यात आली.

शहरातील ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. नागपूरात शासकीय रुग्णालयामध्ये व खाजगी रुग्णालयांमधून सुध्दा लसीकरण केल्या जात आहे.