Published On : Thu, Nov 30th, 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या पाठ्पुरवठ्यामुळे २३७४ घरांचा प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी

NIT
नागपूर: केंद्र शासनाने जाहीर केलेल्या “सर्वांसाठी घरे २०२२” या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत दिनांक २९.११.२०१७ रोजी नवी दिल्ली येथील निर्माण भवन येथे २८ व्या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मुलन मंत्रालयांच्या झालेल्या बैठकीमध्ये नागपूर स्थित तरोडी, ख.क्र. ६३ येथे प्रस्तावितप्रधानमंत्री आवास योजना करिता मंजुरी प्रदान करण्यात आली. राज्य शासनाने या प्रकल्पांची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती त्यानुसार केंद्र शासनाने या बैठकीत मंजुरी प्रदान केली असल्याने सदर योजनेच्यानिर्माण कार्यास सुरवात होईल. नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाकरिता विविध पातळीवरील मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी व या प्रकल्पाच्या जमिन वापराचा बदल प्रस्ताव मंजूर करून या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात आल्याचे नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी माहिती दिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेतर्फे या प्रकल्पाकरिता विविध पातळीवर सतत पाठपुरवठा करण्यात आला होता ज्यामुळे या प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे.

नागपूर सुधार प्रन्यासद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातीलनागरिकांना लाभ मिळणार असून प्रस्तवित मंजूर २३.५ एकर जागेवर नासुप्र द्वारे २३७४ गाळ्यांचे निर्माण करण्यात येणार आहे व सदर इमारत जी + ४ यास्वरूपात राहणार, त्यामध्ये बेडरूम, किचन, हॉल व प्रसाधनगृहाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ‘सर्व सुविधायुक्त अशी घरे’ या दृष्टीने ह्या प्रकल्पाला बघितल्या जात आहे.

ज्यामध्ये पावसाळी नाल्या, मलवाहिका, मल निस्सारण केंद्र, डाबरीरस्ते, साईट डेव्हलपमेंट, दुकाने, सोसायटीकार्यालय तथा योगा केंद्र, कंपाउंड वॉल,रुफ सोलर पावर, रेन वॉटर हार्व्हेस्टिंग इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश राहणार आहे. या प्रकल्पातील गाळ्यांची अनुमानित किमंत प्रत्येकी ७.५ लाख आहे व यावर केंद्र व राज्य शासना मार्फत एकूण २.५ लाखाचे अनुदान प्राप्त होईल. नासुप्र द्वारे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वाठोडा येथे २६४ गाळ्यांचे निर्माण कार्य सुरु झाले असून, मौजा वांजरी येथे ९६० गाळ्यांचे निर्माण कार्य लवकरच सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त तरोडी खुर्द येथे ९४२ घरांचा प्रस्ताव प्रस्तावित आहे.