Published On : Wed, Dec 29th, 2021

भारतीय मानक ब्युरो, नागपूर शाखेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा

Advertisement

नागपूर : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय मानक ब्युरोच्या नागपूर शाखा कार्यालयाद्वारे राष्ट्रीय ग्राहक दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय मानक संस्था देशातील 99 टक्के वस्तूंसाठी व सेवेसाठी मानक निश्चिती करत असून देशातील सर्व ग्राहक व उपभोक्ते यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी भारतीय मानक ब्युरो कटिबध्द राहून देशात वापर होणाऱ्या वस्तुंसाठी आणि सेवेसाठी ब्युरो आपली प्रमाणतेची सेवा देत राहील असे प्रतिपादन भारतीय मानक ब्युरो, नागपूरचे प्रमुख विजय नितनवरे यांनी याप्रसंगी केले. ग्राहकांच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने आपली ” ई – बीआयएस ” ही सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकाला तक्रार नोंदवण्यासाठीची प्रक्रिया ही अत्यंत सुगम झालेली असून ग्राहक ब्युरोच्या सेवेबद्दल सुद्धा तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती त्यांनी दिली.निर्माता, वितरक, ग्राहक यांच्यातील समन्वय राखणे हे ब्युरोचे कर्तव्य असून ग्राहकांचे हित आणि संरक्षण यासाठी ब्युरो सदैव तत्पर आहे. तसेच आपल्या वस्तूंची आणि सेवेची प्रमाणता निश्चित करण्याची प्रक्रिया ऑनलाइन झाली असून दागदागिने आणि जड जवाहिर यांचा व्यापार करणाऱ्यासाठी हॉलमार्किंगचे परवाने सुद्धा ब्युरोतर्फे ऑनलाईन वितरित केल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथि आणि जिल्हा ग्राहक निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती. चंद्रिका बैस यांनी ग्राहक जागरूकता आणि ग्राहक हक्क यावर विस्तृत विवेचन केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ग्राहक सुद्धा आता विना वकील आपली केस कोर्टात लढवू शकतात. तक्रारीचे स्वरूप पाहून जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नुकसानीचा दावा पाहून दंडाची रक्कम निश्चित केली जात असते. ग्राहक खाजगी प्रणाली बरोबरच शासकीय प्रणाली विरुद्ध सुद्धा आपली तक्रार नोंदवू शकतात तसेच सरकार दरबारी होणारी हेळसांड सुद्धा ग्राहक मंचाकडे नोंदवू शकतात . महारेरा आणि ग्राहक मंचामार्फत घर क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकरणाचा निपटारा झाला असून ग्राहकांना आपली भरपाई मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमा दरम्यान “बीआयएस केयर” या मोबाईल ॲप बद्दल माहिती देण्यात आली. मोबाईलद्वारे ब्युरोची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा ॲपचा मुख्य उद्देश असल्याची माहिती देण्यात आली.आखिल भारतीय ग्राहक पंचायत, जनमंच नागपूर, महाराष्ट्र ग्राहक पंचायत, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती अश्या विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते