नागपूर – भारतीय सिनेमाचे प्रतिभावान, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक गुरू दत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसीय विशेष महोत्सव ‘सेलिब्रेटींग गुरू दत्त’ नागपुरात साजरा केला जाणार आहे. पिफ: नागपूर एडिशन आणि मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव १५ आणि १६ नोव्हेंबर २०२५ रोजी वनामती हॉल, नागपूर येथे पार पडणार आहे.
या संपूर्ण महोत्सवाची संकल्पना अजेय गंपावार यांची आहे. या महोत्सवाबद्दल पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले, “गुरू दत्त यांच्या चित्रपटातील आशय, तंत्र आणि काव्यात्म हाताळणीमुळे त्यांची निर्मिती आजही तितकीच प्रभावी आणि आधुनिक वाटते. त्यांच्या चित्रपटातील लाइट आणि शॅडोचा खेळ, चाकोरीबाहेरचे विषय, संगीतातील गोडवा आणि सामान्य माणसावरील अपार आस्था या सगळ्यामुळे गुरू दत्त हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक वेगळे स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक ठरले. त्यांच्या चित्रपटांचे रसग्रहण करणे, ही रसिक, विद्यार्थी, कलाकार आणि नवोदित चित्रपटनिर्मात्यांसाठी एक अमूल्य संधी आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता, गुरू दत्त यांनी चित्रित केलेल्या गीतांची आगळी-वेगळी दृश्यात्मक मांडणी प्रदर्शित करणारा “हम रहे ना हम” हा कार्यक्रम अजेय गंपावार प्रस्तुत करतील. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे असून डॉ. मंजिरी वैद्य अय्यर, योगेंद्र रानडे, ईशा रानडे व डॉ. मनोज साल्पेकर हे गायक कलाकार विविध गीते सादर करतील व मेराकी थिएटरचे कलाकार नृत्य सादर करतील.
दुसऱ्या दिवशी, १६ नोव्हेंबर तारखेला सकाळी १० वाजल्यापासून, भारतीय चित्रपट आणि डिझाइन क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती गुरू दत्त यांच्या कलाजगतातील कार्यावर रसग्रहण करतील. या सत्रात आर्किटेक्ट हबीब खान ‘गुरू दत्त यांच्या चित्रपटातील वास्तुशिल्पाचे संदर्भ’ या विषयावर आपले विचार मांडतील. त्यानंतर, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ती यांच्यावरील माहितीपट ‘लाईट, शॅडो अँड आय’ सादर केला जाणार आहे. सिनेमॅटोग्राफर जहांगीर चौधरी ‘गुरू दत्त यांच्या चित्रपटातील सौंदर्य’ यावर आपले विचार मांडतील. तर फिल्मगुरू समर नखाते ‘गुरू दत्त आणि त्यांचे दिग्दर्शन व आशय’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
महोत्सवाचे विशेष आकर्षण –
१६ तारखेला चित्रकार संजय मोरे व उमेश चारोळे 7 बाय 8 फूट आकाराच्या कॅनव्हासवर एकाचवेळी चित्राकृती साकारणार असून हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. याशिवाय, 30 चित्रकारांच्या गुरू दत्त यांच्या ब्लॅक अँड व्हाईट प्रोर्टेटचे प्रदर्शनदेखील यावेळी भरवले जाईल. याशिवाय, इंटरनॅशनल सुयोग बँड ‘लॅम्पपोस्ट मेलोडिज’ या कार्यक्रमाद्वारे गुरू दत्त यांच्या चित्रपटातील गीते वाजवून त्यांना मानवंदना देतील.
अशा या अभिरूचीसंपन्न कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 8600044432 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अजेय गंपावार यांनी पत्रकार परिषदेत केले.











