Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Thu, Jun 14th, 2018

दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा करुया – विनोद तावडे

मुंबई: संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून या दिवशी ‘योग दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रातही शाळा महाविद्यालयात यादिवशी ‘योग दिन’ साजरा केला जात असताना, दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असे मत शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री. तावडे यांनी राज्यभरातील क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या.

श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले, दरवर्षी २१ जून रोजी योग दिवस साजरा करीत असताना प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा. महिन्याच्या २१ तारखेला सुट्टी असल्यास त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा. योगामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याबरोबरच आजच्या धावपळीत आवश्यक असणारी चपळता, एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे विद्यार्थ्यांना समजून सांगणे आवश्यक आहे.

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करावेत
‘मिशन वन मिलिअन’च्यावेळी राज्यभरात राबविण्यात आलेल्या अभियानाचे सर्व फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर योग दिनानिमित्त राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमाचे फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात यावे आणि त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार कण्यात यावे. योग दिन फक्त २१ जून रोजीच साजरा करुन उद्दिष्ट साध्य होणार नाही.

तरी या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये योग महोत्सव आयोजित करणे आणि यानिमित्ताने विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी २१ जून रोजी योग दिन शाळांमध्ये कशा पद्धतीने साजरा होणार आहे, यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती १६ जूनपर्यंत शिक्षण आयुक्तांना द्यावी, अशा सूचनाही श्री. तावडे यांनी यावेळी केल्या.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145