Published On : Tue, Feb 25th, 2020

पेंच व्याघ्र प्रकल्पाचा 21 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Advertisement

– व्याघ्र प्रकल्पाला २१ वर्ष झाले पूर्ण

रामटेक-: पेंच व्याघ्र प्रकल्पाचा 21 वा वर्धापन दिन अमलतास पर्यटन संकुल सिल्लारी येथे आज उत्साहात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक, डॉ. रविकिरण गोवेकर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक, अमलेंदु पाठक आणि कृष्णाजी केणे उपस्थित होते.

पेंच व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 23 फेब्रुवारी 1999 रोजी झाली. स्थापनेवेळी पेंच हा भारतातला 25 वा व्याघ्रप्रकल्प होता. व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेस एकवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज याठिकाणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी व्याघ्रप्रकल्पाच्या भरभराटीत मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला. व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन वाढीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या निसर्ग मार्गदर्शक, जिप्सी धारक, होमस्टे धारक, रिसॉर्ट मालक, विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, प्राइड ऑफ पेंच स्वयंसहायता महिलांचा गट, प्रथम एज्युकेशन फौंडेशन यांचे प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी निसर्ग भ्रमंती करण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा देखील कृतज्ञता सन्मान करण्यात आला.

त्यांना पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास समिती च्या माध्यमातून निसर्ग संवर्धनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामस्थांचा देखील सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात निसर्ग पर्यटक मार्गदर्शकांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आणि चोर बाहुली वनपरिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या जिप्सी धारकांना रुपये दोन लाखांचे आर्थिक सहाय्याचे धनादेश प्रदान करण्यात आले त्याचप्रमाणे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास समिती सराखा येथील ग्रामस्थांना समितीच्या माध्यमातून मोफत सौर कंदिलांचे वाटप करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सर्व स्टेकहोल्डर यांचे आभार मानले तसेच पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाची आणि ग्रामस्थांची व्याघ्र संवर्धनातील भूमिका यावर आपले मत मांडले. प्रथम संस्थेच्या वतीने यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वन परिक्षेत्र अधिकारी . मंगेश ताटे यांनी केले तर आभार सहाय्यक वनक्षेञ अधिकारी . संजय परेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल एस. झेड. परिहार आणि सर्व वनरक्षक ,वनसेवक यांनी कष्ट घेतले.